जिल्ह्यात गोळीबाराची दुसरी घटना : पोलिसांमुळे मोठे आव्हान..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
गेल्या मंगळवारी रात्री जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात उच्चभ्रू वस्तीत दोन गटात भांडण होऊन एकावर गोळीबार करून जखमी करण्यात आले. आरोपी व त्याच्या साथीदार गोळीबार करून फरार झाले. त्यातील दोघा संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले, तरी मुख्य आरोपी मात्र अद्याप फरारच आहे. या भांडणातील आरोपी आणि फिर्यादी दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगून तसेच जुन्या भांडण्याच्या वादातून हा गोळीबार झाला असे सांगून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे मोकळे झाले. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात उच्चभ्रू वस्तीत रात्री दहा वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना होते. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरते याबाबत पोलिसांना काहीच वाटत नाही का?
बरे जळगाव शहरात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर लगेच शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री चोपडा शहरात एका मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात जाऊन सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी करण मंगले (रा. शिरपूर जि. धुळे) यांनी आपल्या मुलीची दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नणंदेच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाऊन भर कार्यक्रमात दोन्ही कडील वराडी मंडळीच्या उपस्थितीत आपली मुलगी तृप्ती अविनाश वाघ वय 22 हिच्यावर गोळी झाडली. त्यात तृप्ती जागीच ठार झाली तर जावई अविनाश वाघ वय 28 याला पाठीत आणि पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला जमा झालेल्या वराडी मंडळींमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वऱ्हाडी मंडळी संतापली आणि सर्वांनी मिळून गोळीबार करणारे सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मंगले यांना चांगलीच मारहाण केली. वऱ्हाडी मंडळींच्या मारहाणीत किरण मंगले सुद्धा गंभीर जखमी झाल्याने अविनाश वाघ आणि किरण मंगले यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले. त्यानंतर या दोघांना जळगावला हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हणजे हळदीच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून जाऊन किरण मंगले यांनी कार्यक्रमात गोळीबार करून आपली मुलगी तृप्ती हिला प्रेमविवाह केला, म्हणून संपवून टाकले. प्रेम विवाह केल्याचा राग आपण समजू शकतो तथापि दोन वर्षानंतर राग धरून आपल्या मुलीवर गोळी चालवून तिचे आयुष्य पित्याकडून संपवले जाते, हे मात्र मनाला न कळणारे कोडेच आहे.
एकंदरीत एकमेकांवर हातातील काठीने मारहाण करावी तशाप्रकारे बंदुकीचा वापर आजकाल वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक आहेत, असेच म्हणावे लागेल. आपल्या स्वयंसंरक्षणासाठी कुणालाही कायदेशीररित्या बंदुकीचा परवाना दिला जातो. याचा अर्थ त्या बंदुकीचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पोलिसांसाठी हे आव्हानच म्हणावे लागेल. बंदूक चालाविणाऱ्याला आजकाल कायदा आणि पोलिसांचा धाकच राहिलेला नाही असे म्हणावे काय? आज काल बंदुकीच्या परवाना मिळणे इतके सोपे झाले आहे काय? उठसूट कोणालाही बंदुकीचा परवाना द्यावा आणि त्या बंदुकीचा धाक दाखवावा? सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याकडे बंदूक असणे आवश्यक आहे, असे आपण समजू शकतो. परंतु ती बंदूक कुठे आणि कशी चालवायची त्याचे ज्ञान त्या अधिकाऱ्याला नाही, असे म्हणावे काय?
आपल्या मुलीने प्रेम विवाह केला म्हणून त्याचा राग धरून पोटच्या गोळ्यावर बंदुकीने गोळी झाडून त्या मुलीला जागीच ठार करावे, ही कल्पना सुद्धा करवत नाही. एकंदरीत बंदुकीचे परवाने देताना महसूल तसेच पोलीस प्रशासनाने फार विचारपूर्वक परवाने द्यावेत. तसेच परवानाधारक त्याला दिलेल्या बंदुकीचा वापर स्वयं रक्षणात कशा पद्धतीने करतो, याकडे पोलीस प्रशासनाचे जातीने लक्ष असणे आवश्यक आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत झाल्या त्या गोळीबाराच्या घटना पाहिल्या तर त्या बंदुकीच्या वापरात दुरुपयोग जास्त झालेला दिसून येतो. या गोळीबाराच्या घटनेकडे पोलिसांनी गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. अन्यथा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढून पोलिसांना नाकी नऊ आणतील यात शंका नाही…




