छत्रपती श्री शिवाजी महाराज न. प. हायस्कूल देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न; विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :स्थानिक छत्रपती श्री शिवाजी महाराज न. प. हायस्कूल, देऊळगाव राजा येथे २८ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार दिनांक २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत विविध क्रीडा व फिटनेस उपक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला दिवस म्हणून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस ,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर. व्हि. सपाटे सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून,विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख सर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. दंदाले सर यांनी मानवी जीवनात क्रीडा आणि खेळांचे असलेले महत्त्व पटवून दिले, तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास विद्यालयातील श्री. सावळे सर, श्री. खरात सर, श्री. थोरे सर आणि फटके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासकीय परिपत्रकानुसार आयोजित या क्रीडा महोत्सवांतर्गत शाळेत कुस्ती, खो-खो, धावणे (रनिंग) आणि कबड्डी या विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि क्रीडा कल्पकतेने आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आंधळे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन पंजरकर सर यांनी मानले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.




