मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; आंध्र प्रदेशातील तिघांना अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, दोन मोटारसायकलींसह २ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) :दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून मुक्ताईनगर पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि अन्य साहित्य असा एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील संभाव्य गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
पोलीस प्रसिद्धिपत्रकानुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील एस. एम. कॉलेज परिसरात दोन मोटारसायकलींवरून पाच अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांची चौकशी सुरू केली.
पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि अन्य साहित्य आढळून आले. या प्रकरणातील अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये मेकला प्रसन्नकुमार मेकला दास, धर्सिंगम देख घोडेडी ऊर्फ प्रसिंग प्रसाद गुडेडी आणि मेकल विरास्वामी कोडाया यांचा समावेश आहे. हे तिघेही आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
विविध साहित्य जप्त
या कारवाईत पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि ५ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय लोखंडी छरे, स्क्रू ड्रायव्हर, कापडी टोप्या, दोन्ही बाजूंनी टोकदार असलेले हत्यार आणि वेगवेगळ्या क्रमांकांच्या नंबर प्लेट्सही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींची इतर गुन्ह्यांतील संभाव्य भूमिका तपासली जात आहे. तसेच फरार असलेल्या अन्य दोन संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


