चिखली काँग्रेस किसान सेलचा आंदोलनाचा इशारा..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
१५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करा
चिखली : सन २०२५–२६ च्या हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना आजतागायत विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चिखली तालुका काँग्रेस किसान सेलने तहसीलदारांना निवेदन सादर करत १५ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत आवश्यक त्या सर्व अटी व प्रक्रिया पूर्ण करूनही हजारो शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. एकीकडे निसर्गाच्या संकटाने शेतकरी होरपळत असताना, दुसरीकडे सरकारी यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि विमा कंपन्यांचा दिरंगाईचा खेळ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे.
काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष समाधान वासुदेव आकाळ यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, १५ ऑगस्टपर्यंत रखडलेली विमा रक्कम वितरित न झाल्यास चिखली तहसील कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची राहील.
शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. आता आश्वासन नव्हे, तर थेट खात्यात विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही,अशी आक्रमक भूमिका काँग्रेस किसान सेलने घेतली आहे.
निवेदन देते वेळी काँग्रेस किसान सेल तालुका समाधान आकाळ, गणेश ठेंग, रामभाऊ भुसारी, अमोल गजानन मोरे, देविदास लोखंडे, प्रकाश महाराज घुबे, भारत घुबे, रामकिसन हागोने, एन.टी. भुसारी,संजय गिरी, राजेंद्र म्हस्के, विनोद कुटे, प्रभाकर निकाळजे, प्रकाश बनकर, राम कुटे, संदीप डुकरे, लक्ष्मन भिसे यांची उपस्थिती होती✍️



