बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखलीच्या मातीत जन्मलेला वीर सुपुत्र आज अनंतात विलीन ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -:सागर झगरे

चिखली- (दि10 ऑगस्ट) देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना उत्तराखंडमध्ये हवालदार हरिदास कापसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्यांचे पार्थिव चिखलीत दाखल झाल्यानंतर दांडगे ले-आऊट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम यात्रेला सुरुवात झाली.
ही अंतिम यात्रा सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली. मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या शहरातील सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आबालवृद्ध रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

घोषणांनी आसमंत दुमदुमला; डोळ्यांत अश्रू…

अंतिम यात्रेदरम्यान ‘शहीद जवान हरिदास कापसे अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी चिखलीचा आसमंत निनादून गेला. देशासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानाला निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू होते. प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार्थिव पोहोचताच वातावरण अधिकच भावूक झाले. हजारो नागरिकांनी वीर जवानाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार श्वेताताई महाले पाटील, आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला.
हवेत पाच फैरी; वीर जवानाला अखेरची मानवंदना देण्यात आली,
शासकीय इतमामाचा भाग म्हणून जवानांनी हवेत पाच फैरी झाडून हवालदार हरिदास कापसे यांना अखेरची मानवंदना दिली. बंदुकीच्या फैरींच्या आवाजाने परिसर स्तब्ध झाला. त्यानंतर राष्ट्रध्वज तिरंगा कापसे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
तिरंगा कुटुंबीयांच्या हातात सोपविण्यात येताच उपस्थितांचे मन हेलावून गेले. ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी हरिदास कापसे यांनी आयुष्य देशसेवेला वाहिले, तोच तिरंगा आज त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द झाला.
चिखलीच्या मातीत जन्मलेला हा वीर सुपुत्र आज पंचतत्त्वात विलीन झाला; मात्र देशसेवेसाठी दिलेले त्यांचे बलिदान चिखलीकरांच्या आणि संपूर्ण देशाच्या स्मरणात कायम राहणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button