गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा येथे शांतता समितीची बैठक संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यासह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय प्रशासन व देऊळगाव राजा पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक ९ सप्टेंबर रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली.
बैठकीस पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अर्जुन ठोसरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्यासह उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, शांतता समितीचे सदस्य व पदाधिकारी, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी कायद्याचे पालन करून उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गणेश मंडळांनी मंडप उभारणी, ध्वनिक्षेपक व डीजेचा वापर, मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमांबाबत प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
उत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता व वाहतूक व्यवस्था बाधित होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी. तसेच सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना कायम ठेवत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासन व पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकारी व उपस्थित नागरिकांकडून उत्सवाच्या आयोजनासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रशासन, पोलीस यंत्रणा, नगरपरिषद,ग्रामपंचायती आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यावर भर देण्यात आला.



