खापरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत उभारली शिवसृष्टी!

गडकोट प्रेमी आदर्श शिक्षिका नयनाताई सरोदे यांच्या जि.प.खापरखेड शाळेला इतिहासप्रेमींची भेट…
आज दिनांक 18/ 10/ 2025 शनिवार रोजी अकोट व तेल्हारा तालुक्यातील इतिहास प्रेमी शिक्षक बांधवांनी खापरखेड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.या ठिकाणी नयनाताई सरोदे मॅडम कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामग्रीतून पर्यावरणपुरक गड व किल्ले बनवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. शाळेमध्ये त्यांनी जवळपास 15 बाय 10 फुट अशा विस्तीर्ण जागेत किल्ल्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांचे सहाय्य घेऊन तयार केली.ह्या शिवसृष्टी मध्ये शिवनेरी,रायगड,प्रतापगड,देवगिरी अशा महत्त्वपूर्ण किल्ल्यांच्या प्रतिकृती शेणामातीपासून तयार केल्या.सुंदर आणि छोट्याशा गावामध्ये असलेली चिमुकल्यांची छोटीशी जिल्हा परिषद शाळा !. या शाळेमधील हा नयनरम्य असा गडकोट प्रतिकृती देखावा पाहून सर्वजण स्तिमित झाले.जणू काही ह्याची देही, ह्याची डोळा आपण आपल्या परिसरात शिवसृष्टी बघत आहोत, ह्या कल्पनेने तेथे उपस्थित प्रत्येक गडकोट प्रेमी भरवून गेला होता.आजच्या उमलत्या पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास माहित व्हावा,त्यांच्या नसानसातून मावळ्यांचे रक्त खेळावे, ह्या करिता त्यांना इतिहासाचे एकमेव ज्वलंत आणि जिवंत साक्षीदार किल्ल्यांच्या रूपाने आजही बघता यावे, ही भावना मनात रुजवून मुलांना इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन भावे, ह्या भावनेने नयना सरोदे मॅडम ह्यांनी हा ऐतिहासिक गडकोटांचा उपक्रम आपल्या शाळेत राबवला.त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.अनेक ठिकाणचे इतिहास प्रेमी ह्या शिवसृष्टीला भेट देत आहेत.असेच आज दिनांक 18/10/2025 रोजी या शाळेतील गडकोट दर्शनाला इतिहासाचे अभ्यासक लेखक, शिवव्याख्याते श्री संतोष झामरे सर व त्यांच्यासोबत शिवप्रेमी श्री प्रवीण सिरस्कार सर , श्री मनोज लोडम सर इत्यादी शिवप्रेमी शिक्षक अकोट वरून उपस्थित होते . यांच्यासोबतच श्री मनोहर शेळके सर ‘ श्री श्याम पाठक सर , श्री रविंद्र टोहरे सर , श्री अनिल काळे सर ,चौधरी सर, खुमकर मॅडम,अनंत शेटे सर, कु . समृद्धी काळे कु. मधुरा शेटे ‘ खापरखेड गावचे सरपंच श्रीसंतोष दादा खोटरे’, श्री अतुल दादा ढोले,गावकरी मंडळी, अंगणवाडी सेविका व शाळेतील इतर शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते .सर्वप्रथम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले . यानंतर श्याम पाठक सरांच्या बहारदार सूत्रसंचालनात कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांनी फीत कापून गड प्रतिकृतीचे उद्घाटन केल्यानंतर साकारलेल्या अद्भुत गड किल्ल्याचे सर्वांनी निरीक्षण केले व सरोदे मॅडम यांच्याकडून किल्ल्याची माहिती जाणून घेतली . त्यांच्या मेहनतीविषयी व गडकिल्ले विषयी चर्चा झाली .तदनंतर शिवव्याख्याते श्री संतोष झामरे सर यांनी आपल्या अमोघ वाणीतून शिवरायांचा इतिहास सर्वांसमक्ष उलगडला .त्याने उपस्थित सर्व मंत्रमुग्ध होऊन गेले . यानंतर मनोहर शेळके सर,प्रवीण सिरसकार सर ,अनिल काळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.गावकरी मंडळींनीही सर्वांसोबत आपुलकीने चर्चा केली .खापरखेड गावची ही छोटीशी शाळा.त्या शाळेला व विद्यार्थ्यांना सकारात्मक आकार देणाऱ्या नयनाताई सरोदे मॅडम यांची शाळा व उपक्रम पाहून सर्वांनाच कौतुक वाटले . शाळा व गावचे नाते सर्वांना प्रेरणा देणारे होते .सरोदे मॅडम व गावकरी मंडळींनी येणाऱ्या पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली .



