खानदेशखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वेदाच्या परमेश्वरा आधीही तू होतास’ म्हणत प्रस्थापित विचारांना दिले आव्हान; कथाकार बाबुराव बागूल यांना जयंती निमित्त अभिवादन

जळगाव | प्रतिनिधीमराठी दलित साहित्याला नवे वैचारिक अधिष्ठान देणारे, अन्याय-अत्याचाराविरुद्ध आपल्या लेखणीतून बुलंद आवाज उठवणारे ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार आणि विचारवंत बाबुराव बागूल यांची आज जयंती. त्यांच्या साहित्याने मराठी वाङ्मयाला वास्तववादी, विद्रोही आणि मानवकेंद्री दिशा दिली. विशेषतः ‘वेदाच्या आधी तू होतास’ ही कविता आजही वैचारिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरते.बाबुराव बागूल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथे झाला. बालपणातच ते मुंबईतील माटुंगा येथील लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास आले. नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांची कवितेकडे ओढ निर्माण झाली. पुढे कोहिनूर मिल आणि रेल्वेच्या यंत्रशाळेत कामगार म्हणून कार्यरत असताना कामगार चळवळीचा आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला.मार्क्स, लेनिन, गॉर्की, शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्यासह महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी बागूल यांच्या लेखनाला वैचारिक दिशा दिली. सुरत येथे बदली झाल्यानंतरही त्यांनी साहित्यलेखन सुरू ठेवले. अखेर १९६६ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ साहित्यसेवा स्वीकारली.१९६३ मध्ये प्रकाशित झालेला ‘जेव्हा मी जात चोरली होती’ हा कथासंग्रह मराठी साहित्यविश्वात मोठी खळबळ माजवणारा ठरला. त्यानंतर मरण स्वस्त होत आहे, अघोरी, कोंडी, पावशा, सरदार, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा आणि सूड यांसारख्या कथा-कादंबऱ्यांनी त्यांना मराठीतील अग्रगण्य लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. आंबेडकर भारत आणि दलित साहित्य : आजचे क्रांती विज्ञान यांसारख्या वैचारिक लेखनातून त्यांनी आंबेडकरी विचारधारा प्रभावीपणे मांडली.बागूल यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. समाजातील वंचित, शोषित, गावकुसाबाहेरचे जीवन, महिलांवरील अन्याय, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांचे त्यांनी वास्तववादी चित्रण केले. त्यामुळे त्यांच्या साहित्याला विद्रोही आणि परिवर्तनवादी साहित्याचा महत्त्वपूर्ण मानदंड मानले जाते.त्यांची ‘वेदाच्या आधी तू होतास’ ही कविता विशेष चर्चेत राहिली. या कवितेतील “तू” हा शब्द संपूर्ण मानवजातीचे प्रतीक आहे. कवी माणसाच्या सर्जनशीलतेला आणि अस्तित्वाला सर्वोच्च स्थान देत, माणूसच संस्कृती, श्रद्धा आणि देवकल्पनांचा निर्माता असल्याची भूमिका मांडतात. त्यामुळे ही कविता वैदिक परंपरेतील रूढ समजुतींना प्रश्न विचारणारी आणि मानवकेंद्री विचारांचा पुरस्कार करणारी ठरते. साहित्य अभ्यासकांच्या मते, ही कविता प्रस्थापित धार्मिक संकल्पनांपेक्षा माणसाच्या सर्जनशीलतेचा गौरव करणारा वैचारिक दस्तऐवज आहे.बाबुराव बागूल यांच्या साहित्यसेवेचा गौरव महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच विविध संस्थांकडून त्यांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात. १९९९ मध्ये धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.मानवमुक्ती, सामाजिक समता आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या बाबुराव बागूल यांचे साहित्य आजही नव्या पिढीला विचार करायला भाग पाडते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यिक आणि वैचारिक योगदानाला विनम्र अभिवादन.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button