बैलपोळा : वैज्ञानिक व पर्यावरणीय दृष्टिकोन

बैलपोळा हा सण केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नसून, त्यामागे एक अतिशय महत्त्वाचा वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोन दडलेला आहे. बैलपोळा ह्या सणांची रचना निसर्गाच्या चक्राला आणि प्राण्यांच्या आरोग्याला लक्षात ठेवून करण्यात आली आहे. पोळा सणाशी संबंधित वैज्ञानिक पैलू खालीलप्रमाणे आहेत:
१.आरोग्य आणि त्वचा विकार प्रतिबंध
पावसाळ्यात चिखलात काम केल्यामुळे बैलांच्या अंगावर अनेक प्रकारचे कीटक (जसे की गोचीड, उवा) आणि इतर जीव जंतू वाढतात, ज्यामुळे त्यांना त्वचेचे रोग होऊ शकतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे आणि कडुनिंबाच्या पाण्याने स्वच्छ धुतात, त्यानंतर बैलांच्या अंगाला हळद आणि तेल लावले जाते. हळद ही एक नैसर्गिक अँटीसेप्टिक (जंतुनाशक) आहे, ज्यामुळे पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत होते. तेल लावल्यामुळे बैलांची त्वचा मऊ राहते आणि पावसाच्या पाण्याचा थेट परिणाम त्वचेवर होत नाही.
२. शिंगांचे रक्षण
पोळ्याला बैलांच्या शिंगांचा वरचा जुना थर तासून काढतात (याला शिंगे तासणे म्हणतात). वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शिंगे तासल्यामुळे त्यातील मृत पेशी निघून जातात आणि शिंगांना हवा लागते. यामुळे बैलांना होणारा शिंगांचा कर्करोग टाळण्यास मोठी मदत होते.
३. खांदेमळणी
पावसाळ्याच्या सुरुवातीला (जून ते ऑगस्ट) शेतीची मशागत, नांगरणी यामुळे बैलांच्या खांद्यावर आणि पाठीवर प्रचंड ताण आलेला असतो. यामुळे त्यांच्या खांद्याची त्वचा सोलवटते, तेथे सूज येते किंवा गळू होते आणि सततच्या ओझ्यामुळे त्यांचे स्नायू थकतात. त्यामुळे पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांची ‘खांदेमळणी’ करतात, म्हणजेच त्यांच्या खांद्याला कोमट तेलाने किंवा हळद-तेलाने मालिश केली जाते सोबतच कोमट पाण्याने शेक दिला जातो. त्यानंतर हळद आणि एरंडेल तेल किंवा मोहरीचे तेल लावून तिथे हळुवार हाताने मालिश केली जाते. यालाच ‘खांदेमळणी’ म्हणतात.त्याचे शास्त्रीय कारण असे की एरंडेल किंवा मोहरीचे तेल हे स्नायूंना मऊ करते आणि ते वेदनाशामक असते. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक असल्याने जखमा लवकर बऱ्या करते. या मालिशमुळे बैलांच्या खांद्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि तिथले कडक झालेले स्नायू पुन्हा मोकळे व लवचिक होतात.त्यामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूंचा थकवा दूर होतो आणि त्यांना नवीन ऊर्जा मिळते. तसेच पोळ्याच्या दिवशी त्यांना कामातून संपूर्ण विश्रांती दिली जाते.
४. पौष्टिक आहार
पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी, पेंड आणि गोड नैवेद्य दिला जातो. डाळी आणि गूळ यांपासून बनवलेल्या पुरणपोळीतून बैलांना प्रथिने आणि कर्बोदके मिळतात, ज्यामुळे वर्षभराच्या कष्टाने घटलेली त्यांची शारीरिक ऊर्जा आणि ताकद पुन्हा भरून निघण्यास मदत होते.
५. पर्यावरणीय समतोल
हा सण निसर्ग आणि प्राण्यांशी असलेला परस्परसंबंध दर्शवतो. शेतीची मुख्य कामे झाल्यानंतर बैलांची काळजी घेतल्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि त्यांच्या संख्या मध्ये समतोल राखून ठेवण्यास मदत होते, सोबतच रासायनिक खतांपेक्षा बैलांच्या शेणापासून मिळणारे सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, हा देखील या सणाचा एक अप्रत्यक्ष पर्यावरणीय संदेश आहे.
६. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक गोष्टी
बैलांना सजवण्यासाठी रासायनिक रंगांऐवजी पूर्णपणे नैसर्गिक आणि औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. ज्यामध्ये बैलांची शिंगे रंगवण्यासाठी हिंगूळ, हळद, पळसाच्या फुलांचा रंग किंवा तांबडी माती वापरली जाते,हे रंग शिंगांच्या आत झिरपले तरी त्यांना कोणतीही विषबाधा होत नाही. बैलांच्या कपाळावर झेंडूची फुले आणि कडुनिंबाच्या पानांचे बाशिंग बांधले जाते. झेंडू आणि कडुनिंब हे दोन्ही नैसर्गिक कीटकनाशक आहेत. यामुळे सणाच्या गर्दीत बैलांच्या डोळ्यांवर आणि कानांवर माश्या, डास किंवा इतर कीटक बसत नाहीत आणि ते शांत राहतात. बैलांच्या पायात आणि गळ्यात बांधल्या जाणाऱ्या घुंगरांमुळे एक विशिष्ट नाद निर्माण होतो. हा आवाज प्राण्यांना ताणमुक्त ठेवण्यास मदत करतो, असे मानले जाते.
थोडक्यात सांगायचे तर, पूर्वजांनी अत्यंत हुशारीने पशू वैद्यकीय शास्त्र आणि निसर्ग चक्राचा ताळमेळ घालून पोळा हा सण आरोग्यदायी परंपरेच्या रूपात सुरू केला आहे.
डॉ दिक्षा साळवे
चिखली जी बुलढाणा



