कर्कश ‘म्युझिकल’ हॉर्नमुळे मुक्ताईनगरकर त्रस्त; प्रशासन कारवाई करणार का?मुक्ताईनगर

कर्कश ‘म्युझिकल’ हॉर्नमुळे मुक्ताईनगरकर त्रस्त; प्रशासन कारवाई करणार का?मुक्ताईनगर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
: अवैध गौण खनिज व रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर-डंपर वाहनांनी बसवलेल्या कर्कश व गाण्यांच्या धूनवरील हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः “बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है” या गाण्याच्या धूनवर आधारित हॉर्न मोठ्या आवाजात वाजवले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील प्रवर्तन चौक ते बसस्थानक आणि शाळा परिसरातील रस्त्यावरून ही वाहने सुसाट वेगाने ये-जा करत असताना अचानक मोठ्या आवाजात हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. अचानक भीतीदायक पद्धतीने वाजणाऱ्या या हॉर्नमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या ‘म्युझिकल’ व कर्कश हॉर्नला महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग किंवा आरटीओकडून कोणतीही परवानगी नसतानाही हे वाहनचालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. विशेष म्हणजे, संबंधित विभागाच्या नाकावर टिचूनच हे प्रकार घडत असल्याचा आरोपही होत आहे.मुक्ताईनगर ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. संत मुक्ताबाई यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी दर महिन्याच्या एकादशीला यात्रा महोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. अशा धार्मिक वातावरणात कर्कश हॉर्नमुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील सुजाण नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, नियमबाह्य व कर्णकर्कश हॉर्न लावलेल्या टिप्पर-डंपर वाहनांवर प्रशासन कारवाई करणार का? आरटीओ विभाग अशा वाहनांना जप्त करून दंडात्मक कारवाई करणार का?नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अवैध वाहतूक व कर्कश हॉर्नवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.



