ऐतिहासिक ‘करवंड महोत्सव–२०२६’साठी आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांचे मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चिखली: प्रतिनिधी आरुना दत्तात्रय खंडागळे
शासनाकडे केली उत्सव साजरा करण्यासाठी दीड कोटींची मागणी..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणाऱ्या ‘करवंड महोत्सव–२०२६’च्या निमित्ताने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी राज्याच्या ज्येष्ठ मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाकडे दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणीही त्यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील करवंड (ता. चिखली) हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह याच गावातील इंगळे घराण्यातील आदरणीय श्रीमती गुणवंताबाई इंगळे यांच्याशी दि. १५ एप्रिल १६५६ रोजी झाला होता. या ऐतिहासिक विवाह सोहळ्यास यंदा तब्बल ३७० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधत करवंड येथे दि. १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी प्रथमच ‘करवंड महोत्सव–२०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाला योग्य तो मान-सन्मान मिळावा यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना महोत्सवाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.
त्याचप्रमाणे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांनाही प्रत्यक्ष भेटून विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाचे महत्त्व आणखी उंचावेल, असा विश्वास आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला.
हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता एक भव्य ऐतिहासिक उत्सव व्हावा, यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी शासनाकडे दीड कोटी रुपयांच्या विशेष निधीचीही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांच्याशी जोडलेल्या करवंड गावाचे ऐतिहासिक महत्त्व येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हा या उत्सवामागील मूळ हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
करवंड आणि चिखली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित राहून या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले आहे….



