आ. श्वेता महाले पाटील यांच्या ठोस हस्तक्षेपानंतर नॅशनल हायवे प्राधिकरणाची सफाई मोहीम सुरू

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस
चिखली प्रतिनिधी:
आरुना दतात्रय खंडागळे
चिखली–जालना नॅशनल हायवे क्रमांक 753A वरील झाडे व काटेरी झुडपांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर अखेर ठोस कारवाई सुरू झाली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 19 डिसेंबर 2025 पासून नॅशनल हायवे प्राधिकरण (NHAI) कडून झाडे हटविण्याची व रस्ता स्वच्छतेची मोहीम प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा व डिव्हायडरवर वाढलेली मोठी झाडे, काटेरी झुडपे आणि फांद्या रस्त्यावर झुकल्यामुळे वाहनचालकांची दृष्टी अडवत होती. रामनगर फाटा, बेराळा, मलगी, मुरादपूर परिसरात पहाटे व रात्री अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. काही दिवसापूर्वी नामांकित डॉक्टरांचा मृत्यू आणि अंकुश भनगे या तरुणाचा अपघात या परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करणारे ठरले.या पार्श्वभूमीवर स्थानिक पत्रकार समाधान गाडेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांच्यासह नागरिकांनी तहसीलदारांकडे संयुक्त निवेदन सादर केले.
या सर्व बाबींची दखल घेत आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. रात्रीच्या वेळी झाडांमुळे नीलगाय अचानक रस्त्यावर येऊन अपघात होत असल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे सभागृहासमोर मांडला.
आमदारांच्या या हस्तक्षेपानंतर शासन, रस्ते प्रशासन आणि नॅशनल हायवे प्राधिकरण तत्काळ हालचालीत आले.त्याचा परिणाम म्हणून 19 डिसेंबर 2025 रोजी रामनगर फाट्याजवळ नॅशनल हायवेचे अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबीच्या सहाय्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे व झुडपे काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, ठाणेदार शक्करगे, पत्रकार समाधान गाडेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते विनायक सरनाईक, पत्रकार उद्धव थुट्टे पाटील, कृष्णा मिसाळ, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज गाडेकर, तानाजी चिकणे, अरुण वराडे, विशाल सुट्टे, एकनाथ माळेकर, वैजिनाथ शितोळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
लोकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देणारी ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून, आमदार श्वेता महाले पाटील यांच्या लक्षवेधीमुळे आणि स्थानिक पत्रकार व कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली ✍️



