आम्ही महिला स्वतःला ‘अबला’ मानत नाही ; सौ. संतोषीताई निकाडे माजी जिल्हा अध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी!

‘रक्षकच भक्षक बनू नये’, तेल्हारा पोलिसांना राखी बांधून केली जबाबदारीची जाणीव! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा |
नुकताच बहिन-भावाचा असलेला सण “रक्षाबंधन ” हा सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या तेल्हारा शाखेने रक्षाबंधन सण हा अनोख्या पद्धतीने साजरा केला. तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कापसे यांचेसह पोलिस कर्मचारी यांना राखी बांधून महिला आघाडीने त्यांना या सणाचे महत्त्व आणि पोलिसांची जबाबदारी याची आठवण करून दिली. वंचित बहुजन महिला आघाडीच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष विद्याताई शामस्कार , सौ संतोषीताई निकाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेल्हारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या कार्यालयात जाऊन पोलीस उपनिरीक्षक कापसे यांना राखी बांधली. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाघ, राजुभाऊ इंगळे, अमोल सोळंके, रामेश्वर गिरी, गजानन ठोंबरे, सुनील वैराळे, कुलट, योगेश उमक, आणि इतर पोलीस अधिकारी व सर्व महिला-पुरुष यांनाही या शुभप्रसंगी राख्या बांधण्यात आल्या.
यावेळी महिला आघाडीच्या माजी जिल्हा अध्यक्षा सौ.संतोषीताई निकाडे यांनी सांगितले की, आम्ही महिला स्वतःला ‘अबला’ मानत नाही. त्यामुळे बहिणींचे रक्षण भावांनी करावे, या विचारापेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे, ही आमची अपेक्षा आहे. समाजात काही वेळा रक्षकच भक्षक बनतात, असा अनुभव आपल्याला येतो. पुण्यात पोलिसांकडून नागरिकांवर झालेल्या दादागिरीच्या घटनेचा संदर्भ देत, महिलांनी पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
यावेळी महिला आघाडीने एक पत्र वाचून दाखवले, ज्यात स्त्री-पुरुष समानतेचा आणि मानवी हक्कांच्या रक्षणाचा संदेश होता. महिलांचा सन्मान आणि समानता समजत नसेल, तर किमान रक्षाबंधनाचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कापसे यांचेसह पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांना बक्षिसे दिली, तेव्हा “रक्षकच भक्षक बनू नये” हीच खरी ओवाळणी असल्याचे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोकभाऊ दारोकार ,सौ.प्रियकाताई खिरोडकर महिला आघाडी तेल्हारा तालुका महासचिव, संघटक तथा इसापूर ग्रामपंचायत माजी सरपंच सौ.मीराताई बोदडे, सौ. कल्पनाताई हिवराळे शहर अध्यक्ष, सौ.रंजनाताई वानखडे, सौ.आशाताई वाकोडे, सौ.रंजनाताई इंगळे,सौ. सुदर्शनाताई मोहोड ,सौ सुनंदाताई तायडे,
यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लगावली.



