आदिवासी पाड्यावर आश्चर्यकारक प्रसूती; महिलेने एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- ७ ऑगस्ट २०२६
जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथील घटना तीन मुले आणि एका मुलीचा समावेश, आईसह चारही बाळे रुग्णालयात दाखल बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चारबन गावातील आदिवासी पाड्यावर एक आश्चर्यकारक घटना घडली. येथील रहिवासी पळशीराम सस्ते यांच्या पत्नी रियानी सस्ते (वय २७ वर्षे) यांनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. यामध्ये तीन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे रियानी यांची प्रसूती घरीच झाली असून, त्यावेळी कोणताही डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध नव्हते. दुर्गम आदिवासी पाड्यावर आरोग्य सुविधांचा अभाव असतानाही प्रसूती सुखरूप झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रसूतीनंतर आई आणि नवजात चारही बाळांना पुढील तपासणी व उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांकडून आई तसेच चारही नवजात बाळांची तपासणी करण्यात आली.
एकाच वेळी चार बाळांचा जन्म झाल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य सुविधा किती महत्त्वाच्या आहेत, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, आई आणि चारही नवजात बाळांच्या आरोग्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येत असून, पुढील उपचार व निरीक्षणासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. चारबन येथील या अनोख्या प्रसूतीची घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे…… ✍️



