आई’ हा संस्कारांचा पाया; वृद्धाश्रमातील वास्तव समाजासाठी धोक्याची घंटा – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ

‘आई’ हा संस्कारांचा पाया; वृद्धाश्रमातील वास्तव समाजासाठी धोक्याची घंटा – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ
मातृप्रेमाला पर्याय नाही; आईचा सन्मान हीच खरी भारतीय संस्कृती – भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ
हिवरखेड | प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत आईचे स्थान सर्वोच्च असून, वृद्धाश्रमात आई-वडिलांचे वाढते वास्तव ही समाजातील संस्कारांची घसरण आणि सामाजिक जबाबदारीतील अपयश दर्शवणारी गंभीर बाब असल्याचे परखड मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केले. समाजात कौटुंबिक मूल्ये जपली गेली तरच सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि सुदृढ समाजव्यवस्था टिकून राहू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैष्णव ज्ञान मंदिर, वडाळी (सटवाई) येथे ज्ञानेशप्रिय संत ज्ञानेश्वरदास (संतश्री वासुदेवजी महाराज) यांच्या मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकराव पाटील जायले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एकदिवसीय धार्मिक कार्यक्रमात कीर्तनादरम्यान ते बोलत होते. श्री संत भास्कर महाराज भक्त मंडळ, अकोट यांच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला.
श्री वाघ म्हणाले, “राग हा आईच्या अपार प्रेमाचा आणि मुलाच्या हितासाठी असलेल्या कळकळीचा परिणाम असतो. जन्माला पर्याय नाही, कारण प्रत्येक जन्मामागे आईच असते. जगात पद, पैसा आणि प्रतिष्ठेवर अनेकांचे प्रेम असते; मात्र कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या लेकरावर प्रेम करणारी आईच असते. त्यामुळे मातृप्रेमाला कोणताही पर्याय नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, संस्कृत आणि मराठी साहित्यात आईच्या महानतेचे असंख्य उल्लेख आढळतात. मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे वृद्धाश्रमात आई-वडिलांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. ज्यांनी आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले, त्यांच्यावर वृद्धापकाळात उपेक्षित जीवन जगण्याची वेळ येणे हे समाजासाठी लाजिरवाणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास, नैतिक शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक जबाबदारी कमी होत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे सांगत, प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सन्मान करणे हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचे त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. तसेच गाईचे संरक्षण आणि आईचा सन्मान हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित हजारो भाविकांनी पारंपरिक महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी दिली.



