अमृत 2.0 पाईपलाईनमुळे रस्ते उखडले; तातडीने दुरुस्तीची युवक काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष ॲड. चेतन वीरेंद्र झनके यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाईपलाईन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर चिखल, खड्डे आणि घसरडी परिस्थिती निर्माण झाली असून पादचारी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यांचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांची वास्तविक अवस्था दिसत नसून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.युवक काँग्रेसने नगरपंचायतीकडे प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील सर्व उखडलेले रस्ते तातडीने दुरुस्त करून वाहतुकीस सुरक्षित बनविण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा विकासकामांनंतर रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडून वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन नगरपंचायतीने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



