पुरनाड येथील अवैध उत्खनन प्रकरण: आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय हालचालींना वेग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथील गट क्र. १९६ व त्या परिसरातील रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या अवैध उत्खननाबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून महसूल विभागाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाद्वारे त्यांनी, कोणतीही रीतसर परवानगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक केल्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असून, संबंधित जमीन मालक, कंत्राटदार आणि दोषी महसूल अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, असा जाब सरकारला विचारला होता.
यावर महसूल मंत्री यांनी लेखी स्वरूपात उत्तर देताना स्पष्ट केले की, महामार्गाच्या कामासाठी नियुक्त ‘बी.एन.ए. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि.’ या कंत्राटदाराने परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील कारवाईचा भाग म्हणून कंत्राटदाराकडून वाढीव उत्खननासाठी एकूण १ कोटी ३४ लाख रुपये स्वामित्वधन रक्कम भरून घेण्यात आली आहे, तसेच विनापरवाना उत्खनन केलेल्या अन्य एका गटातील अतिरिक्त उत्खननासाठी १२,००० रुपये स्वामित्वधन रक्कम वसूल करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराच्या चार डंपरवर कारवाई करून १ लाख १८ हजार ४४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आता या क्षेत्राची ‘ईटीएस’ (ETS) मोजणी करून अतिरिक्त उत्खनन आणि दंड वसुलीबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार, मुक्ताईनगर यांना देण्यात आले आहेत आणि संबंधित कंत्राटदाराला यापुढे विनापरवाना उत्खनन न करण्याबाबत लेखी ताकीद देण्यात आली आहे.



