महाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

मुक्ताईनगर एमआयडीसीच्या प्रक्रियेला वेग

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा; १३० हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

मुक्ताईनगर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने शुक्रवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एमआयडीसीसाठी प्रस्तावित जागा, जमीन हस्तांतरण आणि प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुक्ताईनगर येथे सुमारे २५० एकर क्षेत्राचा विचार करून १३० हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जमीन मोजणी, उपलब्ध शासकीय जमीन, नकाशे तसेच आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयडीसी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत शासकीय जमिनीची पाहणी, नकाशा तयार करणे आणि पुढील मान्यतेसाठी आवश्यक प्रस्तावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शासन मान्यतेसाठी प्रस्ताव तातडीने तयार करणार…..

प्रस्तावित जागेची मोजणी, नकाशे आणि उपलब्ध शासकीय जमिनीची माहिती संकलित करून एमआयडीसीसाठी शासनाच्या पुढील मान्यतेकरिता आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जमिनीवर असलेल्या लाभक्षेत्राच्या नोंदी तसेच जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेबाबतही यापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चर्चा झाल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
मुक्ताईनगर तालुक्याला महामार्ग, लोहमार्ग तसेच मध्यप्रदेशच्या सीमेलगतचे भौगोलिक स्थान लाभले आहे. याशिवाय इंदूर-हैदराबाद मार्गामुळे या भागातील दळणवळणाची क्षमता आणखी वाढणार आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.

रोजगाराच्या नव्या संधींची अपेक्षा…..

मुक्ताईनगर तालुक्यात एमआयडीसीची उभारणी झाल्यास स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळण्यासोबतच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून मुक्ताईनगर मतदारसंघाच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयडीसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक अधिकारी दिपाली रासवे, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, अभियंता गोकुळ महाजन, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button