अकोट विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन!

विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया झाली सुरू!
निवडणूक आयोगाकडून होतोय विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR-२०२६).
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
आवाज न्यायाचा
वृत्त संकलन
प्रतिनिधी विजय मनोहरराव घोडे
दि. २० सप्टें. २०१६.
अकोट | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR-२०२६) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २८-अकोट विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासह आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात SIR-२०२६ अंतर्गत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जात आहेत.
मतदार यादीत नाव नसल्यास, नाव किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास तसेच इतर बदल करायचे असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे आवश्यक अर्ज सादर करता येणार आहे. दि. १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांच्या आयोजन होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
नागरिकांना मतदार नोंदणीची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी दि. १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील . स्थळ : २८-अकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे .
या विशेष शिबिरांमध्ये नमुना अर्ज क्रमांक ६, ७ आणि ८ स्वीकारले जाणार आहेत. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच आवश्यक बदलांसाठी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीचीही सुविधा .
भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची तपासणी करून आवश्यकतेनुसार अर्ज सादर करावा.
विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेले युवक तसेच दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास १८ वर्षे वय पूर्ण करणारे युवक, महिला आणि दिव्यांग नागरिक, तसेच अद्याप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या मतदार नोंदणीची तपासणी करून आवश्यकतेनुसार नमुना अर्ज क्रमांक ६, ७ किंवा ८ सादर करावा. तसेच कुटुंबातील पात्र सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत किंवा नाहीत, याचीही खात्री करावी.
“आपले नाव मतदार यादीत आहे का? तपासा. नाव नसेल तर नोंदणी करा. एक असल्यास दुरुस्ती करा. अपात्र, मृत किंवा स्थलांतरित मतदार असल्यास योग्य अर्ज सादर करा,” असे आवाहन करण्यात आले आहे.
SIR-२०२६ अंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी विशेष नोंदणी शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपली मतदार नोंदणी सुनिश्चित करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अकोट विधानसभा मतदार- संघ – २८ यांनी केले आहे.



