मुक्ताईनगर पंचायत समितीत बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानीपणा सुरूच; प्रशासन जबाबदार कोण?

मुक्ताईनगर प्रतिनिधी – जरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक फेस रीडिंग हजेरी प्रणाली लागू करण्याचे स्पष्ट लेखी आदेश देण्यात आले असले तरी मुक्ताईनगर पंचायत समितीत मात्र अजूनही पारंपरिक मस्टरवर स्वाक्षरी करून हजेरी लावली जात आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी येण्याजाण्याला उत आला असून यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याची स्थानिक जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
सद्या राज्यभरातील बहुतांश कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती व शिस्त नियंत्रित ठेवण्यात मदत होत आहे. परंतु मुक्ताईनगर पंचायत समितीत ही प्रणाली अद्याप अद्ययावत झालेली नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. हजेरीसाठी अजूनही मस्टर रजिस्टरवर स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचे दिसून येते.
या त्रुटीचा फायदा अधिकारी वर्ग घेत असून, ठरावीक वेळेच्या मर्यादेऐवजी ते कधीही कार्यालयात येतात व जातात. शिवाय काही वेळा वैयक्तिक कामानिमित्त बाहेरही निघून जातात. यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, तक्रारी वाढत आहेत आणि जबाबदारी कुणीही घेत नाही.
यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बायोमेट्रिक प्रणाली असताना व ती लागू करण्याचे आदेश असतानाही ती अद्याप राबवली गेलेली नाही. उद्या या बेजबाबदार प्रकारामुळे कोणी अधिकारी वा कर्मचारी अडचणीत आला किंवा काही अपघात घडला, तर त्यास जबाबदार कोण? शासन की संबंधित अधिकारी?
स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बायोमेट्रिक फेस रीडिंग प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्यात यावी आणि शिस्तभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



