सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव; पावसाच्या खंडामुळे फुलगळ अन् दाणे भरण्यावर परिणाम

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
मेरा महसूल मंडळात गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता; पीक विमा भरपाईबाबत शेतकरी चिंतेत
चिखली तालुक्यातील
*शेतकरी नेते ॲड. गणेश पी. थुट्टे पाटील
मौजे भरोसा, दि. २६ ऑगस्ट २०२६ : मेरा महसूल मंडळातील भरोसा परिसरासह विविध गावांमध्ये सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना पावसाचा खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असून, काही ठिकाणी सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाही पाऊस गायब झाल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी पेरणीच्या वेळेत फरक पडला. त्यानंतर पिकाची वाढ सुरू असताना किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. आता सोयाबीन पीक फुलोऱ्यात व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत, मजुरी तसेच इतर निविष्ठांवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र किडींचा प्रादुर्भाव, पावसातील खंड आणि फुलगळ यामुळे अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेरा महसूल मंडळातील सोयाबीनसह खरीप शेतीचे उत्पन्न घटण्याची दाट शक्यता असल्याचे शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पीक विमा भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वैयक्तिक नुकसानीची नोंद, पंचनामे व तक्रार निवारणाच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व संभ्रमाचे वातावरण आहे. किडींचा प्रादुर्भाव, पावसातील खंड, फुलगळ तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेतील पिकाचे नुकसान याची शेतपातळीवर योग्य नोंद न झाल्यास पीक विम्याच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे कृषी विभाग व महसूल प्रशासनाने मेरा महसूल मंडळातील सोयाबीन पिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, किडींचा प्रादुर्भाव, पावसातील खंड आणि झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना किडींच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच पिकाच्या नुकसानीची योग्य ती नोंद घेऊन पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी नेते ॲड. गणेश पी. थुट्टे पाटील, भरोसा व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाचा खंड, किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री नोंदी न करता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.✍️



