खानदेशमहाराष्ट्रविदर्भ

भीमाकोरेगाव लढाई-परिस्थितीचा परिपाक(भिमराव परघरमोल)

        १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विषमतावादी, मनुवादी, अन्यायी, अनैसर्गिक,  असामाजिक समाजव्यवस्था व कृतघ्न ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंडाला सुरुवात करण्यापूर्वी १ जानेवारी १८१८ रोजी ५०० महार सैनिकांनी ४५ किलोमीटरचा रात्रभर  पायी प्रवास करून; पोटात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब नसताना बारा तासांची लढाई करून अत्याचारी पेशवाईच्या २८०००  सैन्याला धूळ-मातीत लोळवताना  धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ सन १८२२ रोजी उभारलेल्या विजयस्तंभाला आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मानवंदना दिली. तिथे झालेल्या सभेमध्ये अस्पृश्य समाजातील अनेक नामवंत पुढारी हजर होते. त्या सभेमध्ये सहभागी कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "आपल्या पूर्वजांना, म्हणजे त्यावेळच्या महारांना असे स्विकियांविरुद्ध म्हणजे पेशव्यांविरुद्ध  परकीय इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले हा इतिहास फारसा भूषणावह नाही. परंतु त्यावेळच्या परिस्थितीचा तो परिपाक होता."
         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील वरील वाक्याचे विश्लेषण केले, तर त्यामध्ये समतोलता दिसून येते. त्यात ते आपली राष्ट्रनिष्ठा तथा देशभक्ती कायम राखून अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे हा संदेश देताना दिसतात. म्हणूनच ते नेहमी म्हणायचे की, 'गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.'  मग ते बंड कोणाच्याही विरुद्ध असू शकते स्वकियांच्या  अथवा परकीयांच्या.
         ब्रिटिश सरकार विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंडाचा झेंडा का उभारला असावा? कारण त्यांना एक जानेवारी १८१८ साली पेशवे व ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईचा इतिहास माहीत होता. त्या लढाईत आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असणाऱ्या सैनिकांचा; मूठभर महार सैनिकांनी पराभव केल्यामुळे त्यातील शहिदांसाठी  बांधलेल्या विजयस्तंभाला दरवर्षी नूतनवर्षाच्या पहिल्याच तारखेला ब्रिटिशांच्या सैनिकांची एक तुकडी येऊन मानवंदना देत असते. हे सर्व त्यांना ज्ञात होते.
        एवढेच नव्हे तर भारतामध्ये इंग्रजांसह काही परकीय सत्ता पाय का रोवू शकल्या? याचे विश्लेषण करताना अनेक इतिहासतज्ञ तथा विद्वान म्हणतात की, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद होता. तर काहींच्या मते  आपसात मोठी दुही माजलेली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्लेषण काही औरच आहे. ते म्हणतात की, त्या परकीय सत्तांनी एत्तदेशियांचे सैन्य उभारले, म्हणून त्यांना सत्ता संपादन करता आली. अन्यथा पाच-सहा हजार किलोमीटरवरून आलेल्या ब्रिटिशांना एवढे मोठे सैन्य मायदेशातून आणता आले नसते. ते त्यांना आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नव्हते. ज्यावेळी ब्रिटिश भारतात आपला साम्राज्य विस्तार करू इच्छित होते, त्यावेळी नेपोलियन बोनापार्टने इंग्लंडला 'दे माय, धरणी ठाय' करून सोडले होते. अशावेळी ईस्ट इंडिया कंपनीला सैन्यासह द्रव्यबल मिळणे अशक्य होते.
        परदेशातून इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच इत्यादी लोक हातात ताकडी घेऊन भारतात आली. त्यापैकी फ्रेंचांना सर्वप्रथम राज्य स्थापनेचे स्वप्न पडले. अचानक त्याचवेळी त्यांच्या देशात राज्यक्रांती झाल्यामुळे ते त्यांचे दिवास्वप्न ठरले. परंतु रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या वखारीतील कारकूनाने तामिळी पायरियांच्या (अस्पृश्य) तुकड्या उभारून आपल्या स्वप्नांना मूर्त रूप द्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता संपूर्ण देश काबीज केला. 
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या १९ मार्च १९२७ च्या महाड येथील भाषणामध्ये म्हणतात की, ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकास डोके वर काढण्यासाठी अजिबात वाव नव्हता. त्याकाळी स्पृश्यास्पृश्यतेच्या, शिवाशिवीच्या भावना अत्यंतिक तीव्र होत्या. चालताना एखाद्या उच्च जातीच्या व्यक्तीवर सावली पडू नये म्हणून त्याला वळसा घालून जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळून जाईल म्हणून गळ्यात गाडगे आणि ओळख पटण्यासाठी हातात काळा धागा बांधावा लागत असे.
        इंग्रजांमुळे अस्पृश्यांना डोके वर काढण्यास वाव मिळाला. आपल्या अंगी असणारे शौर्य, तेज, बुद्धिमत्ता सिद्ध करता आली. त्यांच्या शिक्षण क्रांतीमुळे जमादार, हवालदार नॉर्मल स्कूलमधून पास होऊन हेडमास्टर, एजुटंट क्लार्क, क्वार्टर मास्टर क्लार्क इत्यादी जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडून दाखवल्या. महिलांसह ९० टक्के लोक साक्षर असून ५० टक्के च्या वर लोक वरच्या दर्जाचे सुशिक्षित होते. अनेक दुर्मिळ हस्तलिखितांच्या प्रती त्यांच्या संग्रही होत्या. हे सर्व शिक्षण आणि सैनिकी भरतीमुळे शक्य झाले होते.
        परंतु म्हणतात ना, 'गरज सरो, नी वैद्य मरो' जर आज जुनी एत्तदेशीय आर्मीलिष्टांची बाळे  चाळून पाहिली, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त अस्पृश्य सैनिकांचा भरणा दिसेल. अतिशय नाममात्र पगारावर ते सैनिक त्यांना उपलब्ध होत असत. तांदुळावरची पेज खाऊन भात आपल्या गोऱ्या सोजीरांना देणाऱ्यांमुळेच ब्रिटिशांना भारत काबीज करता आला. तरीही १८५७ च्या बंडमोडीनंतर एका सैनिकी पाहणीत असे प्रलाप काढण्यात आले की, सैन्यामध्ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला तर अनर्थ ओढवेल. म्हणून सुरुवातीला शिक्षण बंद करून ज्यांनी आपल्या क्षात्रतेज्याने संपूर्ण देश हस्तगत करून दिला त्यांची सैन्यातून गच्छंती करण्यात आली. पुन्हा १९१४ साली  पहिल्या महायुद्धात अस्पृश्यांची आठवण झाली. ते संपताच खर्चाच्या नावाखाली त्यांना डच्चू देण्यात आला. शेवटी १९२६ साली तर अस्पृश्यांना पोलिस आणि सैनिकांमध्ये प्रवेश नाकारून कहराची परिसिमाच गाठली.
        ब्रिटिशांना महारांच्या विविधांगी गुणांची पारख करता आली, मग पेशव्यांना अथवा स्वदेशीय राजांना ती दृष्टी का नसावी?  किंवा आपण स्वकियांच्या विरोधात लढून आपलाच पाय रक्तबंबाळ करून घेत आहोत. हे महारांना कळले नसेल काय? प्रत्येकाला ती जाण नव्हती असे नव्हे. परंतु स्वकीय सत्ता ह्या जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, उच्चनीचता तथा मनुस्मृतीला प्रमाण मानणाऱ्या  असल्यामुळे त्या महारांचा द्वेष  करत होत्या. तरीही इंग्रजांचा दृष्ट हेतू लक्षात घेऊन सिद्धनाक महार व त्यांचे काही निवडक सरदार श्रीमंत बाजीराव पेशव्यांना भेटायला गेले असता, तेथे त्यांनी आपली विनम्र भूमिका त्यांच्यासमोर ठेवली. "स्वकियांच्या विरुद्ध, परकियांच्या बाजूने लढणे आम्हालाही आवडत नाही. आम्ही इंग्रजांना भारतातून कायमचे हद्दपार करू इच्छितो. परंतु आपल्या राज्यात आमचे स्थान काय असेल?" तेव्हा  बाजीरावांनी मनुस्मृतीसह काही धर्मग्रंथांचे दाखले देत  मस्तवालणे उत्तर दिले की, "सुईच्या अग्रावर थरथरणाऱ्या धुळीच्या कणाएवढेही आपले स्थान असणार नाही. तुम्हा महारांची आम्हाला गरज नाही, तुमची असेल तर आमच्या बाजूने लढावे. त्या बदल्यात काहीही मिळणार नाही." अशा एक ना अनेक गोष्टी श्रीमंत बाजीरावाने सुनावल्या. शेवटी त्वेषाने सरदार सिद्धनाक म्हणाले की, "यानंतर होणारी लढाई ही ब्रिटिश विरुद्ध पेशवे नसेल, तर महार विरुद्ध पेशवे अशीच असेल."
        अशाप्रकारे स्वकियांनी हेडसांड केली  आणि इंग्रजांना अनंत कोटी सहकार्य करूनही त्यांनी राजकीय, नैतिक तथा आर्थिकदृष्ट्या शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये बंदी घातली. आज त्यांचीच पिलावळ जिवंत आहे की काय? अशा  तर्कास वाव आहे. कारण काही मस्तवाल लोक आज संपूर्ण बहुजन समाजाला संविधानिक हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवू पाहत आहेत. त्यासाठी अनेक साधू, बुवा, बापू, खिसे कापू, अम्मा-टम्मा हिंदूराष्ट्राच्या गोंडस नावाखाली संविधान बदलाचे दिवास्वप्न रंगवून, मनुस्मृति प्रस्थापनेहेतू लोकमतास भ्रमित करताना दिसत आहेत. आता त्या विरोधातील लढाईसाठी विचारअस्त्राने शस्त्रसज्ज होऊन संविधानिक तथा मानवी मूल्याधारीत समाजव्यवस्था निर्माणास्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महत्त्वपूर्ण संदेश कायम लक्षात ठेवावा, तो म्हणजे

YOU DO NOT FIGHT WITH WEAPONS
YOU SHOULD FIGHT WITH BRAIN AND PEN

       भिमराव परघरमोल
 व्याख्याता तथा अभ्यासक 

फुले,शाहू, आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button