संकटमोचकांनी चर्चा न करता कोळी समाजाला न्याय द्यावामाजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा ना. महाजनांना टोला

जळगाव जिल्हा प्रतिनिधि
रणधीर पवार
जळगाव – गेल्या दहा दिवसांपासून समाज प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वासन दिले आहे. ना. महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी फारशी चर्चा न करता कोळी समाजाला न्याय देऊन संकटमोचक होऊन दाखवावे असा टोला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी लगावला.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोळी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी कोळी समाजातील आंदोलकांशी चर्चा केली. तसेच पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, दोन दिवसापूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी संकटमोचक होऊन कोळी समाजाचे प्रश्न सोडवावे. त्यांच्या मागण्या सरकारने त्वरीत मंजूर कराव्या. कोळी समाज अत्यंत संयमाने संवैधानिक मार्गाने आंदोलन करीत आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत न्याय द्यावा अशी मागणीही डॉ. उल्हास पाटील यांनी केली.



