बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव: देऊळगाव राजा येथे उपविभागीय शांतता समितीची बैठक संपन्न

अवैध धंदे तात्काळ बंद करा; यात्रेला गालबोट लागू देऊ नका – पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांचे निर्देश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांच्या वतीने नगरपरिषद हॉलमध्ये उपविभागीय शांतता समितीची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, एसडीपीओ (SDPO) अर्जुन ठोसरे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, तसेच देऊळगाव राजा, अंढेरा, सिंदखेड राजा व किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करा: आमदार मनोज कायंदे

बैठकीत आमदार मनोज कायंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत प्रशासनाला सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच यात्रेदरम्यान महत्त्वाच्या चौकाचौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील (सिव्हिल ड्रेस) महिला पोलिसांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे छेडछाड, दागिने चोरी आणि पाकीटमारीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अवैध धंदे तात्काळ बंद करा: माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी काही तत्कालीन घटनांचा दाखला देत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. देऊळगाव राजा परिसरात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी त्यांनी पोलीस उपअधीक्षकांकडे केली.

गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करा: पोलीस उपअधीक्षक गायकवाड
लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी उपविभागातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधित चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. यात्रा महोत्सवासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक ती सर्व यंत्रणा पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. यात्रेदरम्यान स्थानिक पातळीवरील छोटे-मोठे वाद शांततेने मिटवावेत, कोणत्याही कारणाने यात्रेला गालबोट लागू नये, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीला नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button