भक्तीगडावरील दसरा मेळावा म्हणजे वंचितांच्या हक्कांचा आवाज; लाखोंनी सहभागी व्हा : डॉ. सुनील कायंदे

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी; २० ऑक्टोबरला सावरगाव येथील भक्तीगडावर ऐतिहासिक मेळावा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथील भक्तीगडावर २० ऑक्टोबर रोजी आयोजित ऐतिहासिक दसरा मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून शेतकरी, ऊसतोड कामगार, कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या आशा-आकांक्षांचे प्रेरणास्थान आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनी केले.
डॉ. कायंदे म्हणाले की, भगवानगडावरील दसरा मेळावा अनेक दशकांपासून समाजप्रबोधन, संघर्ष आणि विचारांची ऊर्जा देणारा मंच राहिला आहे. या व्यासपीठावरून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. ऊसतोड कामगार, शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि वंचित समाजाच्या न्यायासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे हा मेळावा लाखो कार्यकर्त्यांसाठी आत्मविश्वास आणि नवचैतन्याचा स्रोत बनला आहे.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेपेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. गारपीट, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा अन्याय-अत्याचाराची घटना असो, ते नेहमी सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मोडून पडलेल्या माणसाला उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वात होते. म्हणूनच जनतेने त्यांना “लोकनेते” ही पदवी बहाल केली.
डॉ. कायंदे यांनी सांगितले की, मुंडे साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे समर्थपणे पुढे नेत आहेत. आजही ऊसतोड कामगार, शेतकरी आणि वंचित समाजाला त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भक्तीगडावरील दसरा मेळाव्यातून त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडतील आणि संघर्षाला नवी दिशा देतील, असा विश्वास लाखो कार्यकर्त्यांना आहे.
२० ऑक्टोबर रोजी भक्तीगड, सावरगाव येथे होणाऱ्या या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुनील कायंदे यांनी केले.



