सेंट पॉल्स अकॅडमीच्या मोहम्मद मिर्झाची राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेसाठी निवड

हिवरखेड (वार्ताहर ) सेंट पॉल्स अकॅडमी, हिवरखेड येथील विद्यार्थी मोहम्मद मिर्झा याने भालाफेक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. यवतमाळ येथे आयोजित विभागीय स्तरावरील स्पर्धेत त्याने यश संपादन केले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि क्रीडा शिक्षक अनुप चांदणे सर यांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्याच्या खेळातील क्षमता ओळखून त्याला नियमित सराव, योग्य तंत्र, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया, सचिव प्रमोदजी चांडक, उपाध्यक्ष लुंकरणजी डागा, मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापिका निमिता गांधी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोहम्मद मिर्झा आणि क्रीडा शिक्षक अनुप चांदने सर यांचे अभिनंदन केले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही मोहम्मद मिर्झा उत्तम कामगिरी करून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



