सावंगी टेकाळेच्या महिलांचा एल्गार! दुष्काळ संपेपर्यंत कर्जवसुली थांबवा

मायक्रो फायनान्स कंपन्या, बचत गट व बँकांच्या वसुलीला स्थगिती देण्याची तहसीलदारांकडे मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प, हाताला रोजगार नाही आणि दुसरीकडे कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या सावंगी टेकाळे येथील महिला शेतकरी व इतर कर्जदारांनी आता कर्जवसुलीविरोधात आवाज उठविला आहे. दुष्काळ संपेपर्यंत खासगी मायक्रो फायनान्स कंपन्या, बचत गट आणि बँकांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करीत त्यांनी देऊळगाव राजा तहसीलदारांकडे निवेदन सादर केले.
सावंगी टेकाळे येथील महिला शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील कामे उपलब्ध नसल्याने त्यांच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी, कुटुंबाचा खर्च भागविण्यासोबतच कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या, बचत गट तसेच विविध बँकांकडून महिलांनी आणि इतर कर्जदारांनी कर्ज घेतले आहे. यापूर्वी कर्जाचे हप्ते नियमित भरले; मात्र जुलै महिन्यापासून कामे नसल्याने हप्ते भरणे अशक्य झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काम नाही, उत्पन्न नाही; मग हप्ते भरायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत कर्जदारांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी वारंवार फोन करून तसेच घरी येऊन पैशांची मागणी करीत असल्याने कर्जदारांवरील ताण वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित वित्तीय संस्था व फायनान्स कंपन्यांना कर्जवसुली स्थगित करण्याचे निर्देश द्यावेत, कर्जदारांना दिलासा द्यावा आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हप्ते भरण्यासाठी सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर आम्रपाली अरुण झोटे,गीतांजली विनोद झोटे,संगीता दिलीप झोटे,अलका अंबादास साळवे ,गोदावरी रंगनाथ झोटे,राजश्री दत्तू झोटे,शारदा दिनकर झोटे,दीपाली विनोद बनसोडे यांच्या सह अनेक महिलांच्या सह्या आहेत .
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांनाही देण्यात आल्या आहेत. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला शेतकरी व कर्जदारांना प्रशासनाकडून दिलासा मिळणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.



