बांबूच्या झोळीतून रुग्णालयाची वाट; सादुरीच्या मृत्यूने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली, हजारो आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- ६ ऑक्टोबर २०२६
आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रस्ते, आरोग्य, वीज, जात प्रमाणपत्र यांसह दुर्गम आदिवासी भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चाच्या केंद्रस्थानी जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटपरी येथील २२ वर्षीय गर्भवती सादुरी राधेश्याम खरात यांच्या दुर्दैवी मृत्यूचा मुद्दा होता. २५ ऑगस्ट रोजी सादुरी राधेश्याम खरात यांना सर्पदंश झाला. चाळीसटपरी गावाला पक्का रस्ता नसल्याने सर्पदंश झालेल्या सादुरी यांना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थांना बांबू आणि चादरीची झोळी तयार करून त्यांना खांद्यावरून न्यावे लागले. दुर्गम व खडतर रस्त्यामुळे उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला होता
एका तरुण गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली. ‘गावाला पक्का रस्ता असता, वेळेवर रुग्णवाहिका व उपचार मिळाले असते तर सादुरी व तिच्या बाळाचा जीव वाचला असता चाळीसटपरीला पक्का रस्ता कधी?
चाळीसटपरीसह आदिवासीबहुल दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात आली. रस्ता नसल्याने आजारपण, प्रसूती किंवा सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जीव धोक्यात घालून उपचारासाठी जावे लागत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी मांडला. आरोग्य सुविधांसाठीही जोरदार मागणी
आदिवासी भागातील आरोग्य केंद्रे सक्षम करावीत, २४ तास आरोग्यसेवा उपलब्ध करावी, सर्पदंशावरील आवश्यक उपचार व अँटी-स्नेक व्हेनम (ASV) उपलब्ध ठेवावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी करण्यात आली. जात प्रमाणपत्रासाठी गृहभेटीची मागणी बरेला, बिलाला, पावरा, राठिया आदी आदिवासी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. प्रशासनाने दुर्गम भागात गृहभेटी घेऊन जात प्रमाणपत्राची प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. याशिवाय आदिवासी भागातील वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक प्रशासनाला निवेदन
हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले.
एका आईचा आणि तिच्या अजन्म्या बाळाचा जीव गेला आता तरी आदिवासी भागातील रस्ते, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी करत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सादुरी खरात यांच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य व पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन या मागण्यांवर प्रत्यक्ष किती आणि किती वेगाने कार्यवाही करते, याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे…..✍️



