शेतकऱ्यांचा संताप विहिरीत उतरला! मागण्यांसाठी थेट विहिरीत उतरून आंदोलन; प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- ६ ऑक्टोबर २०२६
दुष्काळ, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसह पीकविमा आणि आर्थिक मदतीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असतानाच, जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी फाटा येथे शेतकऱ्यांनी थेट विहिरीत उतरून आंदोलन केले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिवदास खिरोडकार, वैभव जाणे, आकाश आटोळे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यंदाच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला असून, दुसरीकडे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्रमुख मागण्यांचे मुद्दे…..
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत देण्यात यावी, पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, कर्जवाटपातील अडचणी दूर कराव्यात तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य व तातडीने भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. “शेतकरी संकटात असताना केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटणार नाही. शासनाने प्रत्यक्ष मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
विहिरीत उतरून केलेल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचा तीव्र आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे. आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिलासा मिळतो, याकडे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्याने प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे…….✍️



