मुक्ताईनगरात ‘बाप्पा होम’चा जल्लोष; अभिपेंट गॅलरीच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

मुक्ताईनगरात ‘बाप्पा होम’ स्पर्धेचा उत्साह; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
मुक्ताईनगर प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुला-मुलींमध्ये सांस्कृतिक वारसा, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरकतेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि प्रबोधनाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने मुक्ताईनगर येथील अभिपेंट गॅलरीच्या माध्यमातून तालुकास्तरीय ‘बाप्पा होम’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता, ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना वाढीस लागावी, यासाठी या उत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप दिले. याच विचारांची प्रेरणा घेत ‘बाप्पा होम’ स्पर्धेच्या माध्यमातून घरगुती गणेश सजावटीला सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशाची जोड देण्यात आली.
अभिपेंट गॅलरीचे संचालक तथा तरुण रंगकाम व पेंट व्यवसायिक पंकज झनके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत घरगुती गणेश सजावट, आकर्षक मांडणी, विद्युत रोषणाई, पर्यावरणपूरकता, समाजसुधारणा तसेच प्रबोधनात्मक संदेश आदी निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले.
२६ सप्टेंबर रोजी आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणी, नामांकित वकील संतोषकुमार टावारी, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण बोधडे, ज्येष्ठ पत्रकार मोतीलाल जोगी सर, सामाजिक कार्यकर्ते हकीम चौधरी, आयोजक पंकज झनके, अॅड. कुणाल गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
प्रथम पारितोषिक : राहुल प्रकाश पाटील — ५ हजार रुपये
द्वितीय पारितोषिक : सौ. जयश्री भावेश जोगी — ३ हजार रुपये
तृतीय पारितोषिक : शिवम अनुप सुतार — २ हजार रुपये
याशिवाय ‘बेस्ट कॉन्सेप्ट अँड थीम’ या विशेष प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी पूर्वा राजेंद्र झांबरे, सम्राट पंजाबराव पाटील, हरिओम सोमनाथ इंगळे, ज्ञानेश्वर भोई आणि भावेश संजय ठाकूर यांची निवड करण्यात आली.
तर बालकलाकारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लिटल स्टार अॅप्रिसिएशन’ पुरस्काराने मृण्मयी रामदास पाटील, एकता रमेश खेडकर, रिधिमा रितेश गवई, सिद्धेश संदीप विटकर आणि अक्षरा अमोल नाईक यांचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय माळी, रामदास पाटील, शेख आरिफ, ठेकेदार अमोल नाईक, प्रवीण भाई, आप्पा नाईक यांच्यासह विविध मान्यवरांनी सहकार्य केले.
घराघरातील गणेशोत्सवाच्या सजावटीला कला, पर्यावरण, सामाजिक प्रबोधन आणि बालसर्जनशीलतेची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे मुक्ताईनगर तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला सांस्कृतिक परंपरांशी जोडतानाच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते.



