मुक्ताईनगर काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. चेतन झनके मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी संकटात; तातडीने पंचनामे व पाणीटंचाईवरील उपाययोजनांची मागणी
मुक्ताईनगर : यंदाच्या खरीप हंगामात मुक्ताईनगर तालुक्यात पावसाचे असमान व अपुरे प्रमाण, पावसातील मोठे खंड आणि पिकांची झालेली नुकसानीची परिस्थिती लक्षात घेता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राध्यक्ष अॅड. चेतन रविंद्र झनके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना २५ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक भागांत पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळ मूल्यांकन पद्धतीनुसार पर्जन्यमान, कोरडे कालखंड, पिकांची पेरणी व स्थिती, जमिनीतील ओलावा, भूजल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदी बाबींचा विचार करून दुष्काळ परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी झनके यांनी केली आहे.
अॅड. चेतन झनके यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहे
- मुक्ताईनगर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत द्यावी.
- पिकांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन पीकविमा नुकसानभरपाईसाठी आवश्यक कार्यवाही करावी.
- दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जवसुलीस स्थगिती किंवा कर्जमाफीसंदर्भात शासकीय सवलतींचा विचार करावा.
- गावनिहाय संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन टँकर, विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजना आदी उपाययोजना तयार ठेवाव्यात.
- नागरिकांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक चारा छावण्या अथवा पर्यायी उपाययोजनांचा विचार करावा.
- शेतकऱ्यांना वीज, सिंचन व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
- तालुक्यातील परिस्थितीचा विशेष आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी व आवश्यक कार्यवाहीचे आदेश द्यावेत.
शेतकरी संकटाकडे प्रशासनाचे लक्ष आवश्यक
पावसाच्या लहरीपणाचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होत असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे केवळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी न करता प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता या बाबींवर प्रशासनाने वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून शासनाच्या निकषांनुसार योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी अॅड. चेतन झनके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



