सिंदखेडराजा मतदारसंघात हेक्टरी ५० हजार मदत व पीक विमा द्या; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा/सिंदखेडराजा :राज्यात निर्माण झालेल्या #कोरडा_दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये आर्थिक मदत आणि पीक विम्याची नुकसानभरपाई तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले असून, उपमुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून, शासनाकडून भरीव मदत केली जाईल,” असा विश्वास देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
या दौऱ्यादरम्यान माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडले. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत आणि पीक विम्याचे पैसे मिळावेत, अशी आग्रही मागणी खेडेकर यांनी केली. यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.



