माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घेतली बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट; सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकरी समस्यांबाबत दिले निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई व वीज पुरवठा सुरळीत करा!
देऊळगावराजा:सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. मकरंद आबा जाधव पाटील साहेब यांची माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आज अधिकृत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि गंभीर समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांना साकडे
नुकसानभरपाई आणि पीक विम्याची तात्काळ मागणी
डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पालकमंत्र्यांना मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या संकटसमयी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, तसेच पीक विम्याची हक्काची रक्कम त्वरित मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी पालकमंत्री महोदयांना सोपवले.
विद्युत पुरवठा व नादुरुस्त डीपीचा प्रश्न गंभीर
निवेदनात डॉ. खेडेकर यांनी वीज समस्येवरही विशेष भर दिला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध होती, परंतु महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांना पिकांना पाणी देता आले नाही, अशाही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणेच शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विद्युत डीपी (रोहित्र) वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने अतिरिक्त विद्युत डीपी उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी डॉ. खेडेकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, युवासेना सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख दीपक पवार, सरपंच निवृत्ती कठोरे, सतिश राजमाने यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



