लवकरच अकोला शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार “४२ ई सिटी बस”चा लोकार्पण सोहळा!

बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे आणि व्हीलचेअरची सुविधा!
विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आवाज न्यायाचा ,
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला.
दि.२२ सप्टें. २०२६
अकोला येथे दि. येत्या ऑक्टोबर महिन्यात ४२ ई-सिटी बसचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती नुकतीच अकोला चे लोकप्रिय खासदार अनुप धोत्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
अकोला शहराच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या विशेष विकास निधीच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी ई-बसेस, चार्जिंग स्टेशन, इत्यादी कामाची पाहणी खासदार अनुप धोत्रे , आमदार रणधीर सावरकर आदींनी केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर प्रगतीचा आढावा घेत आवश्यक सुविधा व प्रवाशांच्या सोयींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लवकर सिटी बस सुरू झाली पाहिजे याकरिता असंख्य प्रवासी मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याची चर्चा जनमानसात होत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता आधुनिक आणि पर्यावरणपूरक होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरासाठी मंजूर झालेल्या ४२ ई- बसेसपैकी ९ मीटर आणि १२ मीटर प्रकारातील वातानुकूलित ई-बसेस लवकरच अकोलेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचीही माहिती खा. धोत्रे यांनी दिली.
खा.अनुप धोत्रे यांनी ई-बस चार्जिंग सेंटरची याप्रसंगी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. चार्जिंग सेंटरमधील फिटिंगचे काम येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर आर.टी.ओ. शी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. साधारण एका महिन्यात आर.टी.ओ प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे .
या ई-बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे आणि व्हीलचेअरची सुविधा असणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
ई-बस सेवेमुळे शहरातील प्रवाशांना वातानुकूलित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच पारंपरिक इंधनावरील वाहनांच्या तुलनेत ई-बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न होणार आहे.
अकोला शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले असल्याचे चित्र आहे.



