शहीदांच्या त्यागाला सलाम, सेवाभावाचा संकल्प; वानखेड येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ दिमाखदार शुभारंभ…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २५ सप्टेंबर २०२६
‘सेवा संकल्प अभियानाला’ संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रारंभ
वानखेड येथे भव्य रॅली शहीद जवानांच्या आई-वडिलांचा सन्मान, वृक्षारोपण व विविध स्पर्धांचे आयोजन सामाजिक बांधिलकी, देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक मूल्यांची रुजवणूक या उद्देशाने संग्रामपूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वानखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
या अभियानाचा शुभारंभ मा. तहसीलदार श्री. प्रशांत पाटील साहेब, गटविकास अधिकारी श्री. माधव पायघन साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री. सारंग कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून अभियानाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारत देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शहीद जवानांच्या आई-वडिलांचा सन्मान या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाथरूड येथील शहीद जवानांच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्यागाला अभिवादन करत उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. शहीद जवानांच्या आई-वडिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता, पर्यावरण संवर्धन आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. शिक्षक व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन वरणकर, केंद्रप्रमुख श्री. कुलदीप बुंदे, विस्तार अधिकारी श्री. सचिन वडाळ, गटसमन्वयक श्री.अब्दुल्ला खान, तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामसेवक श्री. मेहेंगे साहेब आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. ‘सेवा, संस्कार आणि संकल्पातून सक्षम समाजनिर्मिती’ या विचाराला बळ देणारा हा उपक्रम संग्रामपूर तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला…….✍️



