जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्ह्यात खरीप पिके संकटात; सोयाबीन, उडीद, मूग, कापूस व तुरीवर परिणाम — हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा:- २३ सप्टेंबर २०२६
पावसाने पाठ फिरवली शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
यंदा सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र पिके ऐन वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पावसाने तब्बल ४५ ते ५० दिवसांची दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता मावळू लागल्या असून, हिरवेगार दिसणारे शेत हळूहळू करपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र काही भागांत पाहायला मिळत आहे.
पेरणीनंतर झालेल्या पावसामुळे सुरुवातीला सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका आणि कपाशीची पिके जोमाने वाढली. मात्र पिकांना पाणी मिळण्याची सर्वाधिक गरज असतानाच पावसाने अचानक पाठ फिरवली. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण जाणवत आहे. कडधान्य पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘पेरणीपासून आजपर्यंत केलेला खर्च तरी कसा भरून काढायचा?’ हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बियाणे, खते, औषधांच्या फवारण्या, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची भीती आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. कपाशी आणि तुरीलाही पाण्याची गरज असून, पावसाअभावी वाढ खुंटण्याची शक्यता आहे. काही भागांत पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारणीचा खर्च सहन करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास संकटात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम म्हणजे वर्षभराच्या संसाराचा मोठा आधार. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हा आधारच डळमळीत झाला आहे. एकीकडे उत्पादनाची चिंता, तर दुसरीकडे बियाणे, खत आणि औषधांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, अशी दुहेरी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ‘आभाळाकडे पाहत दिवस जात आहेत; पण पावसाचा थेंब पडत नाही,’ अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाने साथ सोडल्यास केवळ पीकच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पंचनामे व तातडीच्या मदतीची मागणी पावसाच्या दीर्घ खंडामुळे बाधित झालेल्या भागाची प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच पीकविमा आणि शासकीय नुकसानभरपाईबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
निसर्गाने एकीकडे अतिवृष्टीचा फटका दिला आणि आता दुसरीकडे पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात आणली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री आकडेवारीपेक्षा शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. आता शेतकऱ्यांची नजर पुन्हा एकदा आभाळाकडे आहे…
कारण प्रत्येक थेंबात त्यांच्या पिकाचीच नव्हे, तर संपूर्ण वर्षाची आशा दडलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button