खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ

रावेर शहरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी; २४ तासांत आरोपी जेरबंद!

रावेर गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर शहरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या आरोपींना रावेर गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.

रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३०/२०२६ अन्वये भादंवि कलम ३०५, ३३९(३), ३(६) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कल्पना सुभाष वाणी, वय ५२ वर्षे, व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. मधुसूदन मेडिकलसमोर, जुनी नगरपालिका रोड, रावेर, यांच्या घरी १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता कुलूप लावून त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.

दुपारी सुमारे ०२.०० वाजता त्या घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले. तसेच घराच्या मागील दरवाजाचे कडी-कोयंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरातील मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला असता रोख रक्कम ६० हजार रुपये, ०२ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि ०२ सोन्याच्या प्रत्येकी ०५ ग्रॅमच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना देऊन शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.

शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना गुन्हे शोध पथकाला दिवसा चोरी केल्याचे आढळून आले. एका कॅमेऱ्यात संशयित आरोपींचे स्पष्ट चेहरे असलेले फुटेज मिळाल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, जळगाव; हल्ली मुक्काम सिलवासा, जि. नगर हवेली) अशी आहेत.

रावेर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button