गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह शांततेत मिरवणूक काढावी , इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक; ठाणेदार सचिन पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन!दानापूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
आवाज न्यायाचा
वृत्त संकलन
विजय मनोहरराव घोडे
अकोला/ दानापूर
दि. १९ सप्टें. २०२६ | दानापूर येथे पार पडलेल्या शांतता समिती च्या बैठकीमध्ये गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढावी तसेच गणेशोत्सव आनंदात, भक्तीभावात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन हिवरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील यांनी केले. दानापूर येथील ग्रामपंचायत भवनात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते.
ठाणेदार पाटील म्हणाले की, गणेशोत्सवापासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येकाने हे सण उत्साहात साजरे करावेत; मात्र त्याचा त्रास इतर नागरिकांना होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुका सामाजिक संदेश देणाऱ्या असाव्यात. पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढल्यास उत्सवाचे पारंपरिक स्वरूपही जपले जाईल आणि इतरांना त्रास होणार नाही.
तसेच, गणेश मंडळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले. गत वर्षी पारंपरिक वाद्यांचा वापर तसेच विविध उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना प्रसिद्धिपत्र देण्यात आले.
बैठकीदरम्यान ॲड. अजितसिंह सेंगर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सागर ढगे , प्रमुख उपस्थितांमध्ये ठाणेदार सचिन पाटील, बिट जमदार प्रमोद चव्हाण ,योगेश इंगळे ,आशिष साबळे ,रवी वाकोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अफसर खान, श्याम ढाकरे, बंडू ढाकरे, पोलिस पाटील संतोष माकोडे, धम्मपाल वाकोडे, साहेबराव वाकोडे, संदीप पालीवाल, निखिल मिसाळ, गोपाल विखे, पत्रकार भगवान हागे, संजय हागे, शेख राजू यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.



