शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हा होता. कृषी वीज जोडण्यांची वाढती मागणी, वीज वितरण यंत्रणेवरील वाढता भार तसेच मतदारसंघातील भविष्यातील वीज गरजा याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना आमदार कायंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन बंद ठेवून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
मतदारसंघातील वाढती वीज मागणी लक्षात घेता केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता वीज वितरण यंत्रणेची क्षमतावाढ, नवीन पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन नियोजन करण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला विश्वासार्ह व सक्षम वीजपुरवठा मिळावा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार मनोज कायंदे यांनी दिली.
बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता, मेहकर उपविभागीय अभियंता, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार व चिखली येथील अधिकारी, शाखा अभियंते तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



