बसस्थानक जाहिरातींच्या विळख्यात; विद्रूपीकरणाचा प्रश्न ऐरणीवर

प्रवासी सुविधांपेक्षा जाहिरात फलकांचे वाढते प्राबल्य
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शहरातील बसस्थानक परिसरात विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक झळकत असून, त्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे बसस्थानकाच्या सौंदर्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जाहिरातींसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेचा नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा आणि मार्गदर्शक सूचनांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
बसस्थानक हे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असलेले सार्वजनिक ठिकाण आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बसच्या वेळा, मार्ग, तिकीट व्यवस्था, सुरक्षितता तसेच अन्य आवश्यक माहिती स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र, विविध जाहिरात फलकांमुळे बसस्थानकाच्या दृश्यरचनेवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
बसस्थानकांवरील जाहिराती अनेकदा व्यावसायिक जाहिरातदारांना उपलब्ध करून दिलेल्या जागेत लावल्या जातात. त्यामुळे प्रत्येक इंग्रजी जाहिरातीचा संबंध थेट परिवहन विभागाच्या भाषाविषयक धोरणाशी जोडणे योग्य ठरणार नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अधिकृत सूचना, प्रवासी मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती देताना मराठीला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.
रिक्षा व टॅक्सीचालकांकडून मराठी भाषेच्या वापराबाबत अपेक्षा व्यक्त केली जात असताना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अधिकृत माहिती प्रवाशांना सहज समजेल अशा भाषेत आणि स्पष्ट स्वरूपात उपलब्ध आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. भाषेच्या वापराबाबतच्या अपेक्षा सर्व स्तरांवर समान असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बसस्थानक परिसरातील जाहिरात फलकांसाठी निश्चित नियम, आकारमान, जागा आणि देखभालीच्या अटींचे पालन होते का, याची संबंधित यंत्रणेने पाहणी करणे आवश्यक आहे. जाहिरातींमुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच बसस्थानकाचे सौंदर्य, स्वच्छता आणि प्रवासी सुविधा अबाधित राहाव्यात, यासाठी आवश्यक नियमन करण्याची गरज आहे.
बसस्थानकातील जाहिरात फलक कोणत्या नियमांनुसार लावण्यात आले आहेत, त्यासाठी जागा कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते आणि जाहिरातींच्या नियमनासाठी कोणत्या अटी लागू आहेत, याबाबत संबंधित परिवहन यंत्रणेने स्पष्टता देणे आवश्यक आहे. तसेच अधिकृत प्रवासी सूचना आणि व्यावसायिक जाहिराती यांची स्वतंत्र व नियोजनबद्ध मांडणी करण्याची गरज आहे.
बॉक्स मध्ये घ्या….
बसस्थानकाच्या आवारातील जाहिरात जागा नियमानुसार निविदा प्रक्रियेद्वारे संबंधित कंपन्यांना देण्यात येतात. संबंधित कंपन्यांकडून कराराच्या अनुषंगाने जाहिराती लावण्यात येतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या जाहिराती या निविदा प्रक्रियेअंतर्गतच लावण्यात येतात.
संजय गायकवाड
आगार प्रमुख,
देऊळगाव राजा











