देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका डिझेल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा!

समाधान मिसाळ यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत तक्रार; दोषींवर निलंबनाची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिकेच्या डिझेल खरेदी आणि वापरामध्ये मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक अनियमितता (घोटाळा) झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मा. प्रकाश आबिटकर साहेब (आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे मा. तहसीलदार साहेब (तहसील कार्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांच्यामार्फत एक निवेदन सादर करण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णवाहिकेच्या डिझेल खरेदी व वापराबाबत गंभीर आणि संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या आहेत. यासंदर्भात तक्रारदाराने यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक (CS), बुलढाणा यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, आरोग्य प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आणि निष्पक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय बळावला आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदवण्याची मागणी
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये डिझेल खरेदी व वापराबाबत झालेल्या संशयास्पद व्यवहाराचे ते स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी माझा जबाब नोंदवून घेण्यात यावा आणि संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध, पाणी का पाणी अशी निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
शासकीय निधीचा आणि रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या डिझेलचा असा गैरवापर करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता यावर राज्य शासन आणि वरिष्ठ आरोग्य प्रशासन काय पावले उचलते, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.











