जळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

मुद्दा क्रमांक १० व ११ मध्ये बदल न झाल्यास पीक विमा भरण्यावर बहिष्काराचा इशारा; रावेर तालुका सेतू व महा-ई-सेवा केंद्र चालकांचे निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

रावेर : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून रावेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच सेतू केंद्र चालकांच्या विविध अडचणींबाबत तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन महत्त्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक १० व ११ मध्ये सेतू केंद्र चालक व सामायिक सुविधा केंद्रांवर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत काही महत्त्वाच्या बाबी नमूद आहेत. शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्ष कोणते पीक घेतले आहे, तसेच भाडेतत्त्वावरील शेतीसंदर्भातील कागदपत्रे व स्टॅम्प आदींची खातरजमा करण्यासंदर्भात सेतू केंद्र चालकांवर जबाबदारी येत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुद्दा क्रमांक १० व ११ मध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत तसेच सेतू केंद्र चालकांना पीक विमा प्रक्रियेबाबत अधिकृत व सविस्तर प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सेतू केंद्र चालकांवरील अनावश्यक जबाबदारी स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, “शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक १० व ११ मध्ये आवश्यक बदल करण्यात आले नाहीत, तर रावेर तालुक्यातील सेतू केंद्र चालक प्रधानमंत्री पीक विमा भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकतील,” असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शासन व प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सेतू केंद्र चालकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. रक्षाताई खडसे (खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार), मा. एकनाथराव खडसे साहेब (विधानसभा आमदार), मा. चंद्रकांतभाऊ पाटील (आमदार, मुक्ताईनगर विधानसभा), मा. अमोलभाऊ जावळे (आमदार, रावेर विधानसभा) तसेच मा. नंदकिशोरभाऊ महाजन (विधान परिषद आमदार) यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे रावेर तालुक्यातील पदाधिकारी नकुल बारी, ललित सोनार, जयवंत चौधरी, स्वप्निल पवार, अमोल बारी, विजय पाटील, संदीप यवतकर, विजय पाचपोळे,पुरुषोत्तम(धनराज)घेटे, संजय पवार मनीष बाविस्कर, राहुल जैन यांच्यासह इतर सेतू केंद्र चालक व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी हितासाठी काम करताना सेतू केंद्र चालकांना स्पष्ट नियम, योग्य प्रशिक्षण व प्रशासकीय सहकार्य मिळणे आवश्यक असून, शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button