पाऊस नाही, पीक नाही; तरी बैलपोळ्यात शेतकऱ्यांची कृतज्ञता कायम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगाव
ढोरपगांव येथे बैलपोळा साजरा,
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतातील पिके करपली असून, पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या समस्येमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण साधेपणाने साजरा केला.
पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून त्यांना स्वच्छ केले. त्यांच्या शिंगांना रंग लावून आकर्षक सजावट करण्यात आली. गळ्यात घुंगरांच्या माळा, अंगावर झूल आणि विविध प्रकारच्या सजावटी करून बैलांना सजविण्यात आले. घरातील महिलांनी बैलांची औक्षण करून पूजा केली. पुरणपोळी, गोडधोड पदार्थ तसेच नैवेद्य दाखवून बैलांना खाऊ घालण्यात आला.
दरवर्षी पोळ्याच्या दिवशी गावातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून जाते. मात्र यंदा दुष्काळामुळे हा उत्साह काहीसा कमी दिसून आला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आर्थिक संकटाची चिंता स्पष्ट दिसत असली, तरी बैलांविषयीची आपुलकी आणि कृतज्ञता मात्र कायम होती.
“पाऊस पडला नाही, पीक आले नाही; पण संकटाच्या काळातही आमच्या सोबत राबणाऱ्या बैलांचा सण आम्ही कसा विसरू?” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दुष्काळाने परिस्थिती बिकट केली असली तरी शेतकरी आणि बैल यांच्यातील नाते आजही तितकेच घट्ट आहे. उदरनिर्वाहाचे साधन कमी झाले, तरी कृतज्ञतेची परंपरा मात्र कोरडी पडलेली नाही, हेच यंदाच्या बैलपोळ्याने दाखवून दिले.



