देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या

राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) चे तहसीलदारांना निवेदन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी आकडेवारी न घेता तालुका निहाय नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई आणि आवश्यक मदत देण्यात यावी.व देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,देऊळगाव राजा तालुक्यात यावर्षी पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. तालुक्यात अनेक भागांत अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, पाण्याअभावी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिके करपू लागली आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी, बियाणे, खते, औषधे, मशागत यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून,उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत.या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्याच्या आधारे झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करून देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.शासनाच्या नियमानुसार कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती व मदतीचा लाभ तातडीने देण्यात यावा.यामध्ये प्रामुख्याने नुकसानग्रस्त पिकांसाठी तातडीने शासकीय आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी.शेतीपंपांच्या वीजबिल माफ करण्यात यावे,पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याची व चऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी.
तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा आणि शैक्षणिक फी पूर्ण माफ करून त्यांना शैक्षणिक सुविधा मोफत देण्यात याव्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे,तालुका अध्यक्ष मन्नान पठाण, नारायण कोल्हे,शौकत हुसेन,नगर सेवक ऍड. रामेश्वर रामाने,भुजंग चेके,संजय दहातोंडे, शिवाजी कोल्हे, विलास खराट, रमेश सोसे, भिकाजीं निलख, संतोष शेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.



