बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री व्यंकटेश महाविद्यालयात कै. राजे राजेंद्रसिंह जाधव यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी संपन्न

स्मृतीस्थळ पूजनापासून रक्तदानापर्यंत, माजी व्यावसायिक विद्यार्थ्यांशी संवादापासून क्रीडा स्पर्धांपर्यंत उपक्रमांची मांदियाळी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे आणि श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान देणारे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. राजे राजेंद्रसिंह जाधव यांचा स्मृतिदिन महाविद्यालयात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कै. राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतीस्थळाचे विधिवत पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांची विशेष उपस्थिती होती.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराने समाजभानाचा संदेश दिला. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आजी – माजी विद्यार्थ्यांसह ३१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वेच्छेने रक्तदान केले. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती द्वारा आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला सबलीकरण ही प्रेरणादायी संकल्पना रेखाटण्यात आली.

सांस्कृतिक विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारक्षमता, आत्मविश्वास आणि प्रभावी अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी समयस्फूर्त भाषण स्पर्धा विशेष उत्साहात पार पडली. कार्यक्रमातील सर्वाधिक लक्षवेधी उपक्रम ठरला तो ‘टॉक शो : माजी विद्यार्थी व्यावसायिकांशी संवाद’. विविध क्षेत्रांत यशस्वीपणे व्यवसाय करणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचा खजिना विद्यमान विद्यार्थ्यांसमोर खुला केला.

स्मृतिदिनानिमित्त टेबल टेनिस, बॅड मिंटन अशा विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपली क्रीडा निपुणता सादर केली. सामाजिक बांधिलकी, कलात्मक अभिव्यक्ती, बौद्धिक विकास, व्यावसायिक मार्गदर्शन आणि क्रीडासंस्कार यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या स्मृतिदिन कार्यक्रमाने कै. राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन केले. संस्थापक अध्यक्षांनी घालून दिलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या परंपरेला पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्मृतिदिन कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button