बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गावच्या ५६ रत्नांचा आगळावेगळा सन्मान; कर्तृत्व, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा अविस्मरणीय सोहळा

“नोकरी मिळवून थांबू नका, समाजासाठीही हात पुढे करा” — प्रा. संजय खडसे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : गावातील विविध क्षेत्रांत आपले करिअर घडवून नोकरीत यश मिळविणाऱ्या तब्बल ५६ युवक-युवतींचा एकाच मंचावर सन्मान करून गावातील नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श ठेवणारा आगळावेगळा आणि दर्जेदार सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत आणि सेवन स्टार मित्र मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमामुळे कर्तृत्ववान युवकांसह त्यांच्या पालकांचा आणि ग्रामस्थांचा अभिमान द्विगुणित झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय खडसे, उपविभागीय महसूल अधिकारी होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुनरावजी ठोसरे उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक आनंद झोटे, डी. के. झोटे, प्राचार्य सुरेश बुरकूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन पवार, गजानन चेके, राजू चित्ते सर, सुधाकर झोटे, पत्रकार देवानंद झोटे, शिक्षक नेते ज्ञानेश्वर टेकाळे, सरपंच शिवाजी झोटे, उपसरपंच दीपक बुरकूल, राजू अण्णा मुंढे, जगन बुरकूल, निलेश टेकाळे, सुनील झोटे, दामोदर बनसोडे, गणेश झोटे, माणिकराव झोटे, युवा उद्योजक नारायण टेकाळे यांच्यासह सेवन स्टार मित्र मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सत्कारमूर्ती, त्यांचे आई-वडील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या ५६ युवक-युवतींसोबत त्यांच्या आई-वडिलांचाही फेटे बांधून व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नुकत्याच एमपीएससीच्या संयुक्त गट-ब परीक्षेत राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झालेल्या जयेश झोटे यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

गावासाठी काहीतरी देणे लागतो : प्रा. संजय खडसे

प्रा. संजय खडसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, माणसाचा जन्म समाजात होतो, तो समाजातच जगतो आणि त्याचे समाजाशी आयुष्यभराचे नाते असते. आपण ज्या गावात वाढलो, खेळलो आणि शिकलो त्या गावाबद्दल प्रत्येकाच्या मनात आपुलकी व कर्तव्याची भावना असली पाहिजे. गावाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींवरून नव्हे, तर शिक्षणाचा दर्जा, युवकांचे करिअर आणि त्यांच्या जीवनमानातील सकारात्मक बदल यावरून ठरतो.

आजच्या स्पर्धेच्या युगात एमपीएससीसारख्या परीक्षा अत्यंत कठीण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत गावातील युवकांनी एसटीआय, पीएसआयसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. एका यशस्वी व्यक्तीने आपल्या मागे येणाऱ्या किमान एका युवकाला हात दिला, तरी समाजात परिवर्तनाची मोठी साखळी निर्माण होऊ शकते. नोकरी मिळविणे हे केवळ वैयक्तिक यश नसून समाजाप्रतीची जबाबदारीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गावातील गुणवंत युवकांनी एकत्र येऊन गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करावी तसेच गावातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. “आपण ज्या गावात घडलो, त्या गावासाठी काहीतरी देणे लागतो,” ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, असेही प्रा. खडसे म्हणाले.

गीतांनी आणली कार्यक्रमाला रंगत

कार्यक्रमादरम्यान प्रा. संजय खडसे यांनी आपल्या सुरेल व भावस्पर्शी आवाजात ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ तसेच ‘जीव कंटाळला यार, शहराकडे चल ना गावाकडे’ ही गीते सादर केली. त्यांच्या गायनाने ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने काही काळ सभागृहात आनंददायी आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. प्रेरणादायी विचारांसोबत त्यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुनरावजी ठोसरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, ग्रामीण भागातील युवकांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात. कर्तृत्ववान युवकांना एकाच मंचावर सन्मानित केल्याने त्यांच्या मागे येणाऱ्या पिढीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या आयोजनात शिक्षक नेते ज्ञानेश्वर टेकाळे यांनी विशेष पुढाकार घेतला. ग्रामपंचायत आणि सेवन स्टार मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कार सोहळा न राहता गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जाणीवेचा उत्सव ठरला.

“माणसाने आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंद निर्माण करावा आणि त्याचबरोबर आपल्या गावातील, समाजातील व मागे राहिलेल्या लोकांकडेही लक्ष द्यावे,” असा भावनिक संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

कार्यक्रमाचा कालावधी मोठा असतानाही उपस्थितांनी शेवटपर्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ५६ कर्तृत्ववान युवकांचा सन्मान, पालकांचा गौरव, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि प्रा. संजय खडसे यांच्या सुरेल गायनाने रंगलेली मैफल यामुळे हा सोहळा गावाच्या इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पोलिस अधिकारी गुलाबराव झोटे व दीपक बुरकूल यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button