खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

स्वानंदीच्या देशभक्तीला सीमेवरून मिळाले अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’; रावेरच्या विद्यार्थिनीने ५६ ए.पी.ओ. पत्त्यावर पाठवलेल्या राख्या पोहोचल्या थेट सैनिकाच्या हाती!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

रावेर (प्रतिनिधी):
स्थानिक ‘सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, रावेर’ येथील विद्यार्थिनी स्वानंदी हिच्या एका सुंदर आणि संवेदनशील विचाराने यंदाचा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी बांधण्याची तिची तीव्र इच्छा आणि त्यातून घडलेला सैनिकाशी संवादाचा हृदयस्पर्शी प्रसंग सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
स्वानंदीने रक्षाबंधनापूर्वी आपल्या पालकांकडे सैनिकांना राखी पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पत्ता माहीत नसल्याने तिने स्वतः गूगलवरून माहिती शोधून काढली. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली असता, अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केवळ “INDIAN ARMY C/O 56 APO” असा संक्षिप्त पत्ता लिहून दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी राख्यांचे पाकीट टपाल पेटीत टाकले.
नवीन पिढीने टपाल पेटी किंवा पत्रव्यवहार जवळून पाहिलेला नसताना, स्वानंदीने अत्यंत उत्सुकतेने ही प्रक्रिया पूर्ण केली. एवढ्या छोट्या पत्त्यावर राखी पोहोचेल की नाही अशी साशंकता असतानाच, अगदी रक्षाबंधनाइतक्या शुभ दिवशी हे पाकीट सीमेवरील आर्मी ऑफिसमध्ये सुखरूप पोहोचले.
राख्या हाती पडताच एका भावुक झालेल्या सैनिकाने थेट स्वानंदीच्या पालकांशी फोनवरून संपर्क साधून आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर ग्वाल्हेर येथील आपल्या घरी जाऊन राखी बांधताना त्यांनी पुन्हा स्वानंदीला फोन लावला व त्यांच्या पत्नीनेही तिच्याशी मनमोकळा संवाद साधला. राखी बांधल्यानंतर त्या सैनिकाने प्रेमाचे व आशीर्वादाचे प्रतीक म्हणून फोन-पे (PhonePe) द्वारे १०१ रुपये पाठवून स्वानंदीला अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले.
पैशांपेक्षाही या पाठीमागे असणारी सैनिकाची आपुलकी, देशभक्ती आणि स्वानंदीचा निरागस आनंद यामुळे हा रक्षाबंधन सोहळा अविस्मरणीय ठरला. डिजिटल युगात टपाल सेवेची ओळख आणि सीमेवरील जवानांशी जोडलेले हे रेशीमबंध इतर सर्व विद्यार्थ्यांसाठीही अत्यंत प्रेरणादायी ठरले आहेत. स्वानंदीच्या या देशभक्तीपर उपक्रमाचे सौ. कमलाबाई एस. अगरवाल हायस्कूलच्या प्राचार्य सौ एच एस कोल्हे उपमुख्याध्यापक आर एल तायडे पर्यवेक्षक एम जी पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक भरभरून कौतुक करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button