प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची दुरवस्था; तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची दुरवस्था; तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील अल्फला उर्दू हायस्कूलपासून भवानी मंदिरापर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांची ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आणि परतताना मोठमोठे खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसून, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीच्या दृष्टीने ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरशाळेच्या मार्गावरच रस्त्याची अशी अवस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नगरपंचायतीकडून शहरातील मूलभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात नोटिसा देण्यापेक्षा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर प्रशासनाने प्राधान्याने काम करावे, अशी मागणी काही व्यावसायिक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासन आता तरी जागे होणार का?प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिक, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अल्फला उर्दू हायस्कूल ते भवानी मंदिर या मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रशासन या गंभीर समस्येवर कोणती भूमिका घेते, याकडे प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




