सायकलच्या ५०० रुपयांवरून वाद; देऊळगाव राजा तालुक्यात तरुणाला गाडीत टाकून अपहरण करत बेदम मारहाण

सावखेड भोई येथील तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; देऊळगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा |: सायकलच्या व्यवहारातील अवघे ५०० रुपये शिल्लक राहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सावखेड भोई येथे घडली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ४ नामजद आणि ५ अनोळखी अशा एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांच्या वादातून मारहाण अन् अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश दिलीप राऊत (वय ३३, रा. त्र्यंबक नगर, देऊळगाव राजा) यांच्या काकांचा आरोपी शुभम डोंगरे याच्यासोबत सायकलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील ५०० रुपये बाकी होते. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:०० वाजेच्या सुमारास सावखेड भोई येथे याच कारणावरून वाद झाला. आरोपी किशोर डोंगरे याने फिर्यादीच्या काकाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरोपी शुभम डोंगरे, किशोर डोंगरे आणि आतिष वाघमारे यांनी मिळून काकाला चापटबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
फिर्यादी मंगेश राऊत हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपींनी “तुझ्याशी घरी बोलायचे आहे” असे सांगून मंगेश यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. आरोपी शुभम डोंगरे आणि इतर ५ अनोळखी इसम मंगेश यांना गाडीत टाकून भिवगाव येथे घेऊन गेले.
डोळ्यावर काचेची शिशी मारली, पाठीवर पट्ट्याने वारभिवगाव येथे सर्व आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून मंगेश राऊत यांना पुन्हा शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त झालेल्या शुभम डोंगरे याने मंगेश यांच्या डाव्या डोळ्याजवळ काचेची शिशी मारून गंभीर जखमी केले, तर एका अनोळखी इसमाने त्यांच्या पाठीवर पट्ट्याने बेदम मारहाण केली. ‘तुला पाहून घेतो’, अशी धमकीही आरोपींनी दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी जखमी मंगेश राऊत यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शुभम किशोर डोंगरे, किशोर उत्तम डोंगरे, अशोक उत्तम डोंगरे, आतिष गणेश वाघमारे (सर्व रा. सावखेड भोई) आणि ५ अनोळखी इसमांविरुद्ध बी.एन.एस. (BNS) कलम १८९(२), ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा (अप क्र. ३९९/२०२६) दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पुढील तपास देऊळगावराजा पोलीस तपास अधिकारी,करत आहे.



