देऊळगाव राजा येथील सातेफळ रोडवर अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार; अज्ञात व्यक्तीकडून रस्त्यावर दिवा लावून जादूटोण्याचा प्रयत्न?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :शहरातील सातेफळ रोड परिसरात चौफुलीवर एका अज्ञात व्यक्तीकडून रस्त्या कडेला दिवा लावून जादूटोणा अथवा अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ रोडवरील निर्जन ठिकाणी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर दिवा लावला.
हा दिवा सामान्य नसून त्याभोवती जादूटोणा सदृश काही साहित्य आणि संशयास्पद कृती केल्याचे दिसून आले. या मार्गावरून जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ याचे छायाचित्र (फोटो) काढून हा प्रकार उघडकीस आणला.शहरात व परिसरात अशा प्रकारे खुलेआम अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी व जादूटोणा प्रथांना प्रतिबंध व उच्चाटन कायद्यानुसार’ अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे आणि जादूटोणा करणे हा गंभीर गुन्हा आहे.
या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना देण्यात येत असून, रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवावी आणि अशा अघोरी कृत्यांद्वारे भीती पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातेफळ रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.



